Join us  

मी शेअरिंग नव्याने शिकलो: सागर देशमुख, अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 8:38 AM

कामं वाढल्यावर मी आणि प्राजक्ताने मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आणि गोरेगावला एक फ्लॅट घेतला.

- शब्दांकन: तुषार श्रोत्री

‘ट्वेल्थ नाईट’, या शेक्सपियरच्या कलाकृतीवर आधारित ‘पिया बेहरुपिया’ या हिंदी नाटकाच्या प्रयोगांसाठी मी २०१२ ते २०१७ पुणे -मुंबई- पुणे असा अविरत प्रवास केला. कधी शिवनेरीने तर कधी मिळेल त्या वाहनाने. एक्स्प्रेस वे वरचे बोगदे मला डोळे मिटूनही सवयीने जाणवायचे. मुंबईत मुक्काम करावाच लागला तर गीतांजली कुलकर्णी, तृप्ती खामकर किंवा अतुल कुलकर्णी यांच्याकडे हक्काने राहायची सोय व्हायची; पण मग २०१७ मध्ये मुंबईतली कामं वाढल्यावर मी आणि प्राजक्ताने मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आणि गोरेगावला एक फ्लॅट घेतला.

नित्यनेमाने मुंबईत येत जात असलो तरी मला पक्का मुंबईकर व्हायला थोडा वेळ लागला; कारण या शहराचा ‘वेग’ वेगळाच आहे. इथल्या संस्कृतीत समरस व्हायला आधी ती संस्कृती तुम्हाला आतून अनुभवायला लागते. दुसऱ्याला मदत करण्यात दाखवली जाणारी तत्परता हा इथल्या संस्कृतीचाच भाग आहे. इथल्या गर्दीचा तुम्हीही एक अंश असल्याने तुम्हाला इथे कधीच एकटेपणा जाणवत नाही. पुण्यात वैयक्तिक स्पेस निश्चितच जास्त मिळते तर मुंबईतल्या गर्दीतही सुरक्षित वाटतं. मुंबई आणि पुण्याच्या कलाकृतींची जरी तुलना केली तरी या दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांच्या शहरांची वैशिष्ट्य आपल्याला जाणवतात. पुण्याच्या कलाकृती या शांत, उत्कट असतात तर मुंबईच्या कलाकृती या जास्त आक्रमक, वरच्या पट्टीतल्या असतात.

इथल्या मराठी भाषेतही थोडीशी गंमत आहे. कोणी वारल्याची वाईट बातमी सांगताना बरेचजण अमुक-तमुक ‘ऑफ झाले’, असं म्हणतात. तुमचा भले टू बेड रूम्सचा मोठा फ्लॅट असेल, तरी ते माहिती असूनही एखादा तुम्हाला सहज विचारतो की तुझी रूम कुठल्या बिल्डिंगमध्ये आहे? 

आम्हाला मित्र-मैत्रिणी आलेले, आमच्याकडे राहिलेले फार आवडतं. कदाचित त्यामुळे आम्हालाही चांगल्याच माणसांचा सहवास मिळत असेल. मी जेव्हा माझ्या उमेदीच्या काळात मुंबईत सतत येत होतो तेव्हा गीतांजली किंवा तृप्तीच्या घरी ज्या मोठ्या मनाने माझं स्वागत व्हायचं, ते मी कधीच विसरू शकणार नाही. आमच्या घरातही एक बेडरूम ही मृण्मयी गोडबोले, पर्ण पेठे यांच्यासाठी सदैव राखून ठेवलेली आहे आणि ती त्यांचीच खोली म्हणून संबोधली जाते. ही शेअरिंगची भावना मला या मुंबई शहराने दिलेली अनमोल शिकवण आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सागर देशमुख