Join us

फैसलचा चित्रपट बघण्यास आमिरकडे वेळ नाही ?

By admin | Updated: October 15, 2015 14:02 IST

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशननसाठी नेहमी हटके फंडे वापरणा-या आमिर खानकडे यावेळी त्याचा भाऊ फैसल खानचा चित्रपट पाहण्यासाठीही वेळ नाहीये.. त्याचे प्रमोशन करणं तर दूरची गोष्ट आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.  १५ - आपला किंवा मित्राचा, भाच्याचा चित्रपट असो, अभिनेता आमिर खानने चित्रपटाच्या प्रमोशनासाठी नेहमीच हटके अंदाज वापरला आहे, रिलीजच्या दिवशीच चिट्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणा-या बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिरकडे यावेळी मात्र त्याचा भाऊ फैसलचा चित्रपट पाहण्यासाठी वेळ नाही, त्याचे प्रमोशन करणं तर दूरच राहिलं.... 
मेला चित्रपटात आमिर सोबत काम केल्यानंतर फैसल खान बराच काळ सिल्व्हर स्क्रीनपासून दूर राहिला होता. त्याचे आजारपण, आमिरसोबत झालेला त्याचा ( कथित) वाद या सर्व अफवांनंतर तो चित्रपटात दिसलाच नाही. पण आता फैसल मोठ्या पडद्यावरील पुनरागमनासाठी सज्ज झाला असून त्याचा 'चिनार : दास्तान ए इश्क' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. 
आपल्या पुनरागमनासाठी उत्सुक असलेला फैसल हा चित्रपट आमिरला दाखवण्यासाठी मात्र फारसा उत्सुक दिसत नाही. माझा भाऊ परफेक्शनिस्ट आहे, त्यामुळे त्याला हा चित्रपट आवडेल की नाही याबाबत मी साशंक आहे, असे फैसल म्हणतो. सध्या आमिर त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगासाठी लुधियानाला गेला आहे, तो तेथे व्यस्त असल्याने त्याच्याकडे हा चित्रपट पहायला वेळ नाहीये आणि त्यामुळेच त्याने चित्रपटाबद्दल कोणतेही मत व्यक्त केले नाही, असेही फैसलने सांगितले. 
मध्यंतरीच्या काळात आमिर आणि फैसलमध्ये खटके उडल्याच्या अफवा फिरत होत्या. मात्र असे काहीच नसून आम्हा दोघांमधील संबंध चांगलेच आहेत, विशेष म्हणजे आमिरने आपल्याला एका चित्रपटाची स्क्रीप्टही ऑफर केली आहे, असे फैसलने स्पष्ट केले.