Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते'मधील अविनाशची पत्नी निलिमा खऱ्या आयुष्यात आहे सिंगल, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 07:00 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने छाप उमटविली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने कमी कालावधीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेत अनिरूद्धचा लहाना भाऊ अविनाशची पत्नी निलिमा नेहमी सर्वांबद्दल काहीतरी उकरून काढून टोमणे मारताना दिसते. या पात्राने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. निलिमाची भूमिका अभिनेत्री शीतल क्षीरसागरने साकारली आहे. या मालिकेशिवाय सध्या ती झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सिमी काकू म्हणजेच सीमा चौधरी ही भूमिका निभावत आहेत.

बालपणापासून आपल्या मनावर चित्रपटांचा पगडा असतो त्या ग्लॅमरस जगाचे आकर्षण तेव्हापासूनच अभिनेत्री व्हावे असे शीतल क्षीरसागरला वाटू लागले होते. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी मासूम हा हिंदी चित्रपट पाहिला त्यावेळी मला या मुलीची भूमिका का नाही दिली? असे आई वडिलांना निरागस भावनेने तिने विचारले होते. तेव्हापासून तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली. मग नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली, नाटकांतून काम केले. कॉलेजमध्ये असताना नाट्यस्पर्धा गाजवल्या.

१९९९ साली रात्र आरंभ या पहिल्या मराठी चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘एक होती वादी’ हा चित्रपट तिच्या वाट्याला आला कारण या चित्रपटातली वादी ही प्रमुख भूमिका तितकीच आव्हानात्मक होती. वादी मूकी असल्याने चित्रपटात तिला एकही संवाद नव्हता केवळ चेहऱ्यावरील हावभावावरूनच तो अभिनय साकारायचा होता. त्यामुळे या भूमिकेची सर्वत्र खूप प्रशंसा झाली. एक होती वादी या चित्रपटाला महाराष्ट्र शासना सह तब्बल ५३ पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे आयुष्यातला उल्लेखनीय चित्रपट म्हणून त्या या चित्रपटाकडे पाहतात.

शीतल क्षीरसागर अजूनही सिंगल आहे. पण ती एकटी नसून तिचा संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याचा उपभोग मी घेते असे ती सांगते. क्वीन मेकर , रणांगण हे नाटक तर का रे दुरावा, एक होती राजकन्या, आई कुठे काय करते अशा अनेक मालिकेतून तिने काम केले आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका