Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या त्या सीनवर कौतुकाचा वर्षाव, सलग तीन दिवस चालला होता तो सी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:25 IST

३१ पानांची संहिता असलेला हा प्रसंग कलाकारांनी जीव ओतून सादर केला. त्यामुळेच या खास भागाचं सर्वांकडून कौतुक होत आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचा विषय, दर्जेदार लिखाण, उत्तम दिग्दर्शन आणि या सर्वाला न्याय देणारा कलाकारांचा कसदार अभिनय यामुळेच या मालिकेने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. सध्या मालिकेत यश आणि गौरीच्या साखरपुड्याचा ट्रॅक पाहायला मिळतो आहे. मात्र साखरपुड्याच्या दिवशी गौरीने आपण आई होऊ शकत नाही हे सत्य सर्वांना सांगितलं आणि आईपणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. आई होणं एवढ्यातच स्त्रीचं स्त्रीत्व आहे का या विषयावर भाष्य करणारा हा प्रसंग मालिकेत सलग तीन दिवस चालला. ३१ पानांची संहिता असलेला हा प्रसंग कलाकारांनी जीव ओतून सादर केला. त्यामुळेच या खास भागाचं सर्वांकडून कौतुक होत आहे.

 

'आई कुठे काय करते' मालिकेतल्या या खास भागाविषयी सांगताना अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणाल्या, ‘एकाच लोकेशनवर , एकाच विषयावर तीन भाग फक्त चर्चा चालू ठेवणं हे टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असावं. तरीही प्रेक्षकांनी हे तिन्ही भाग समरसून पाहिले  हे खूप विशेष आहे. आई ह्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी घेऊन केलेल्या मालिकेमध्ये आई होणं ह्या विषयावर गेले 3 एपिसोड सर्व बाजूंनी चर्चा चालू आहे.

वेगवेगळ्या व्यक्तिरेखेच्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या कोनातून इतकी सारासार चर्चा. हा संपूर्ण सीन वाचनातच 41 मिनिटांचा होता. 3 संपूर्ण एपिसोड फक्त हीच चर्चा चालू आहे आणि प्रचंड सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. याचं संपूर्ण श्रेय आमची लेखिका मधुराणी गोडबोले, पटकथा लेखिका नमिता वर्तक, दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि संपूर्ण आई कुठे काय करतेच्या टेक्निकल टीमचं आहे. या टीमवर संपूर्ण विश्वास ठेवणारे आमचे निर्माते राजन शाही आणि स्टार प्रवाहच्या संपूर्ण टीमचं आहे. आजवर मालिकेला मिळालेलं प्रेम अभूतपूर्व आहे हे प्रेम असंच वाढत राहो हीच अपेक्षा. 

 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका