नवी दिल्ली - केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने बनावट ब्युटी प्रोडक्ट विक्री करण्याच्या आरोपाखाली एका महिलेला अटक केली आहे. ही महिला सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याशिवाय रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या माजी संचालकाशी तिचे कनेक्शन आहे. दिल्ली आणि मुंबईत ईडीने विविध ठिकाणी धाड टाकून ही कारवाई केली आहे. ही पूर्ण कारवाई PMLA अंतर्गत सुरू असणाऱ्या तपासणीचा भाग आहे.
संदीपा विर्क आणि तिच्या साथीदारांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्यावर खोटी आश्वासने आणि बनावट वस्तूच्या माध्यमातून लोकांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीचा तपास पंजाबच्या मोहाली येथील एका एफआयआरपासून सुरू झाला होता. ज्यात IPC कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात मोठा खुलासा समोर आला की, संदीपा विर्क स्वत:ला Hyboocare.com नावाच्या वेबसाईटची मालकीण असल्याचे सांगते. जी FDA ने परवाना दिलेले प्रोडक्ट विकते. परंतु प्रत्यक्षात हे प्रोडक्ट बनावट असतात.
या वेबसाइटवरून ना रजिस्ट्रेशन होते, ना पेमेंट गेटवे सुरू असतो. सोशल मीडियावरही काही खास प्रसार नाही. व्हॉट्सअप नंबरही बंद आणि कंपनीचा पत्ताही स्पष्ट नाही. याशिवाय संदीपा विर्कचा संपर्क नटराजन सेथुरमन यांच्याशी असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले. सेथुरमन हे रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे माजी संचालक होते. या दोघांमध्ये बेकायदेशील लायजिंगबाबत चर्चा होत असायची. सेथुरमनच्या घराची झडती घेतली असता तो वैयक्तिक फायद्यासाठी फंडचा चुकीचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
२०१८ साली १८ कोटींचं कर्ज
२०१८ मध्ये रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडकडून सेथुरमन यांना सुमारे १८ कोटी रुपये कोणत्याही योग्य चौकशीशिवाय देण्यात आले हे तपासात आढळून आले व्याज आणि मुद्दल रकमेच्या परतफेडीवर कोणतेही बंधन नव्हते इतक्या कर्जाच्या अटी शिथिल होत्या. याशिवाय त्यांनी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडकडून २२ कोटी रुपयांचे गृहकर्ज देखील घेतले होते, जे नियमांविरुद्ध होते. या पैशाचा मोठा भाग चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात आला आणि अजूनही थकबाकी आहे.
छापा मारताना अनेक महत्त्वाची कागदपत्रे, नोंदी आणि साक्षीदारांचे जबाब सापडले
दरम्यान, ईडीने १२ ऑगस्ट रोजी संदीपा विर्कला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. तेथून संदीपाला १४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आले. तपास अजूनही सुरू आहे. येत्या काळात या प्रकरणी आणखी मोठे खुलासे होऊ शकतात.