Huma Qureshi Brother Murder: बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातून ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची याची पार्किंगच्या वादातून हत्या करण्यात आली. स्कूटी पार्किंगवरून झालेल्या छोट्या वादाचे रूपांतर आसिफ कुरेशीच्या हत्येत झाले.
दिल्लीतील निजामुद्दीन भागात अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची पार्किंगच्या वादातून हत्या झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल लेनमध्ये घडली. हे खळबळजनक खून प्रकरण समोर येताच दिल्ली पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी कारवाईस सुरुवात केली. हत्येतील दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास आसिफ कुरेशीचा काही लोकांशी त्याची स्कूटी गेटसमोरून हलवून बाजूला पार्क करण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर आसिफला गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींनी किरकोळ कारणावरून क्रूरपणे हल्ला केल्याचा आरोप आसिफची पत्नी आणि नातेवाईकांनी आरोप केला आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
"स्कूटर पार्किंगच्या मुद्द्यावरून आरोपींशी झालेल्या वादानंतर रात्री १०.३० वाजता आसिफ कुरेशी, जंगपुरा, वय ४२ वर्ष, याची हत्या करण्यात आली. या वादात एका आरोपीने पीडितेच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला, ज्यामुळे पीडितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी बीएनएस अंतर्गत एफआयआर क्रमांक २३३/२५ दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षांचा उज्ज्वल आणि १८ वर्षांचा गौतम अशी आरोपींची ओळख पटली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे," अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
मृत आसिफ कुरेशीच्या पत्नीने सांगितले की,'शेजारच्या एका मुलाने रात्री ९.३०-१०.०० च्या सुमारास घराबाहेर त्याची स्कूटर पार्क केली होती, त्यामुळे दरवाजा बंद झाला. आसिफ त्याला म्हणाला की बेटा, गाडी थोडी पुढे पार्क कर. पण त्या मुलाने शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि म्हणाला की तुला येऊन सांगतो. यानंतर तो मुलगा वरच्या मजल्यावरून खाली आला आणि त्याच्या छातीवर धारदार वस्तूने वार केला. त्याचा भाऊही त्या मुलासोबत आला. आसिफच्या छातीतून रक्त येऊ लागले. मी ताबडतोब जावेदला घरी बोलावले, पण तोपर्यंत आसिफचा मृत्यू झाला होता.'