Join us

Zomato Share : Zomato ला GST कडून ₹८०३.४ कोटींची टॅक्स डिमांड; शेअरमध्ये मोठी घसरण, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:15 IST

Zomato GST Demant : फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील कंपनी झोमॅटोच्या शेअरमध्ये १३ डिसेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात मोठी घसरण झाली.

Zomato GST Demant : फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील कंपनी झोमॅटोच्या शेअरमध्ये १३ डिसेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे २.५ टक्क्यांची घसरण झाली. याचं कारण म्हणजे कंपनीला मिळालेली नोटीस. प्रत्यक्षात झोमॅटोकडून ८०३ कोटी रुपयांच्या जीएसटीची मागणी करण्यात आली आहे. झोमॅटोनं एक दिवस आधी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आयुक्तालयाच्या सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क सहआयुक्तांकडून जीएसटी नोटीस प्राप्त झाली आहे. नोटीसमध्ये कंपनीकडून लागू व्याजासह ४०१ कोटी ७० लाख १४ हजार ७०६ रुपयांचा जीएसटी मागितला आहे. तेवढ्याच रकमेचा दंडही भरण्यास सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे झोमॅटोकडून एकूण ८०३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

ही नोटीस २९ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी आहे, असं कंपनीनं एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटलंय. डिलिव्हरी चार्जेसवर जीएसटी न भरणं हे नोटीशीसाठीचं कारण असल्याची माहिती समोर आलीये. सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम ७४ अंतर्गत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी हा आदेश जारी करण्यात आला आणि कंपनीला तो १२ डिसेंबर रोजी मिळाला. या आदेशाविरोधात कंपनी योग्य प्राधिकरणाकडे दाद मागणार असल्याचंही कंपनीनं म्हटलंय.

१४० टक्क्यांची वाढ

झोमॅटोचे शेअर्स बीएसईवर फ्लॅट होते. सकाळी कंपनीचा शेअर २७९.८० रुपयांवर उघडला आणि मागील बंदच्या तुलनेत सुमारे २.५ टक्क्यांनी घसरून २७७.९० रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला. पण नंतर त्यात किंचित वाढ झाली. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये सुमारे १४० टक्के वाढ झाली आहे. झोमॅटोने यावर्षी नोव्हेंबरमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे (क्यूआयपी) ८,५०० कोटी रुपये उभे केले होते.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजारगुंतवणूकजीएसटी