Join us

UltraTech बनली जगातील 'तिसरी' सर्वात मोठी सिमेंट कंपनी; बातमी येताच शेअर्स वधारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 21:42 IST

अल्ट्राटेक सिमेंटने केसोराम इंडस्ट्रीचा सिमेंट व्यवसाय खरेदीचा निर्णय घेतला आहे.

Ultratech Cement: भारतातील सिमेंट उद्योगात अल्ट्राटेक सिमेंटचे नाव आघाडीवर आहे. आता ही कंपनी जगातील तिसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली आहे. कंपनीने केसोराम उद्योगाचा सिमेंट व्यवसाय विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्या कंपनीने ही कंपनी 7600 कोटी रुपयांमध्ये हा सौदा केला आहे. या करारामुळे कुमार मंगलम बिर्ला आता अदानीच्या सिमेंट व्यवसायाला तगडी स्पर्धा देणार आहेत.

एव्ही बिर्ला ग्रुपची सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंट, बीके बिर्ला ग्रुपच्या केसोराम इंडस्ट्रीजचा सिमेंट व्यवसाय शेअर स्वॅप डीलमध्ये विकत घेईल. केसोराम इंडस्ट्रीजचे एकूण मूल्यांकन कर्जासह, सुमारे 7600 कोटी रुपये आहे. केसोराम यांनी शेअर बाजाराला सांगितले की, त्यांच्या संचालक मंडळाने शेअर स्वॅपद्वारे सिमेंट व्यवसाय विक्रीला मंजुरी दिली आहे. केसोरामच्या 52 शेअर्ससाठी अल्ट्राटेक सिमेंटचा एक शेअर त्यांच्या शेअर धारकांना मिळेल.

केसोरामच्या एका शेअरची किंमत 10 रुपये आहे. केसोरामकडे सध्या कर्नाटकातील सेडाम आणि तेलंगणातील बसंतनगर येथे 1.07 कोटी टन क्षमतेचे दोन सिमेंट युनिट्स आहेत आणि 6.6 लाख टन क्षमतेचा सोलापूर, महाराष्ट्र येथे एक पॅकिंग प्लांट आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात केसोरामची सिमेंट व्यवसायातून उलाढाल 3,533.75 कोटी रुपये होती.

विशेष म्हणजे, हा सौदा बिर्ला कुटुंबातच झाला आहे. बीके बिर्ला यांचे नातू कुमार मंगलम बिर्ला अल्ट्राटेकचे मालक असलेल्या एव्ही बिर्ला समूहाचे प्रमुख आहेत. अल्ट्राटेक ही चीनबाहेर जगातील तिसरी सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे, ज्याची एकूण क्षमता 137.8 मिलियन टन आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे त्याची क्षमता 160 दशलक्ष टन होईल. 

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकशेअर बाजारअदानी