Share Market Open 1st Feb : सामान्यत: भारतीय शेअर बाजार शनिवार आणि रविवारी बंद असतो. पण काही प्रसंगी बाजारात ट्रेडिंग सुरू असते. त्याचप्रमाणे फेब्रुवारीचा पहिला दिवस म्हणजे १ फेब्रुवारी रोजी शनिवारी असून या दिवशी शेअर बाजार खुला राहणार आहे. कारण याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
किती वाजेपर्यंत खुला राहणार?
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजनं (NSE) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शेअर बाजार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता उघडेल, जो दुपारी ३.३० वाजेपर्यंत खुला राहील. याआधीही शनिवारी अर्थसंकल्प सादर झाला असताना शेअर बाजार खुला होता. शनिवारी ज्यांना बाजार सुरू होण्यापूर्वी ट्रेड करायचं आहे, ते सकाळी ९ ते ९:०८ या वेळेत ट्रेड करू शकतात.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ हा १ फेब्रुवारी रोजी सादर होणार असल्यानं हा दिवस एक्सचेंजने विशेष ट्रेडिंग डे म्हणून घोषित केलाय. अधिकृत अधिसूचनेनुसार, १ फेब्रुवारी रोजी ब्लॉक डील मीटिंग-१ ची वेळ रात्री ०८:४५-०९.०० दरम्यान असेल. त्यानंतर सकाळी ९ ते ०९.४५ या वेळेत प्री-ओपन सेशन होईल. कॉल ऑक्शन लिक्विड सेशनची वेळ सकाळी ०९.३० ते दुपारी ३.३०आणि ब्लॉक डील मीटिंग-२ दुपारी २.०५ ते २.२० या वेळेत होईल. त्यानंतर दुपारी ३.४० ते ४.०० या वेळेत क्लोजिंग सेशन होईल.
१ तारखेला अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभा आणि राज्यसभेची बैठक होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेसाठी लोकसभेने ३ आणि ४ फेब्रुवारी आणि राज्यसभेने तीन दिवस निश्चित केलेत.