Join us

रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:12 IST

TCS Share Price: टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने कंपनीचे बाजार भांडवलही कमी झाले आहे. यासह, टाटा समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात टीसीएसचा वाटा देखील कमी झाला आहे.

TCS Share Price: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा समूहातील प्रत्येक कंपनीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. आज टाटा समूहातील प्रत्येक कंपनी एक ब्रँड बनला आहे. यातही आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही रतन टाटा यांची आवडती होती. ही कंपनी देशातील दुसरी मौल्यवान कंपनी समजली जाते. मात्र, टीसीएसचा शेअर गेल्या ६ महिन्यांत सुमारे १७% ने घसरला आहे. या घसरणीमुळे टाटा समूहाच्या एकूण बाजार भांडवलात टीसीएसचा वाटा कमी झाला आहे. आता ते ४४.८% पर्यंत खाली आले आहे, जे मार्च २००९ नंतर सर्वात नीचांकी स्तर आहे. टीसीएसच्या लिस्टिंगनंतर मार्केट कॅपमध्ये ही मोठी घसरण आहे. मार्च २०२० मध्ये, टाटा समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात टीसीएसचा वाटा ७४.४% होता.

टाटा समूहाचे मार्केट कॅप किती कमी झाले आहे?टीसीएसने अलीकडेच २०२५ च्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले, त्यानंतर शेअरमध्ये सतत घसरण दिसून येत आहे. कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले आहेत. या वर्षी आतापर्यंत टाटा समूहाच्या कंपन्यांच्या बाजार भांडवलावर नजर टाकल्यास, २४ पैकी १८ सूचीबद्ध कंपन्या घसरणीच्या स्थितीत आहेत. या वर्षी आतापर्यंत टाटा समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १९.४८% किंवा २.८९ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

जर आपण शेअरच्या किमतीवर नजर टाकली तर, डिसेंबर २०२४ पासून टीसीएसमध्ये सतत घसरण होत आहे. डिसेंबरपासून या शेअरचा भाव प्रति शेअर ४,४७३.९० रुपयांवरून २५.६२% ने घसरून ३,३२७.७० रुपयांवर पोहोचला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत त्यात सुमारे १७% घट झाली आहे. मंगळवारी टीसीएसचे बाजार भांडवल ११.९७ लाख कोटी रुपये होते. टाटा समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या २६.६ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलात टीसीएसचा वाटा सुमारे ४५% आहे. मार्च २०२४ पासून, टीसीएसचे बाजार मूल्य सुमारे १५% ने घसरत आहे.

वाचा - 'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

२१ वर्षांपूर्वी टीसीएस सूचीबद्धऑगस्ट २००४ मध्ये टीसीएसचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाले, तेव्हा कंपनीचे बाजार भांडवल ४७,२३२ कोटी रुपये होते. त्यावेळी, टाटा समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात टीसीएसचा वाटा ४९% होता.

टॅग्स :रतन टाटाटाटाशेअर बाजारशेअर बाजार