Tata Motors Demerger Date: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्यानंतर टाटा उद्योग समुहात अनेक नवीन बदल पाहायला मिळत आहेत. याच बदलाचा भाग म्हणजे ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडने आपल्या व्यावसायिक वाहन व्यवसायाला वेगळे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनी आता दोन स्वतंत्र युनिट्समध्ये विभागली जाणार आहे. हा निर्णय गुंतवणूकदार आणि कंपनी दोघांसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.
डिमर्जर कधी लागू होईल?टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने या डिमर्जरला (विलगीकरणाला) मंजुरी दिल्यानंतर, आता १ ऑक्टोबर २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) ने नुकताच या योजनेवर आपला निर्णय राखून ठेवला होता, जो आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
व्यवसायाची नवीन रचना कशी असेल?या डिमर्जरनंतर, टाटा मोटर्सचे दोन स्वतंत्र भाग होतील. यातील एक भाग व्यावसायिक वाहन युनिट असेल. या युनिटमध्ये फक्त व्यावसायिक वाहनांचा व्यवसाय असेल. हे युनिट 'टीएमएल कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड' या नवीन नावाने ओळखले जाईल. तर दुसऱ्या भागाचे नाव प्रवासी वाहन युनिट होईल. हे युनिट 'टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड' या नावाने काम करेल. यामध्ये प्रवासी वाहने, इलेक्ट्रिक वाहने आणि जग्वार लँड रोव्हर यांसारख्या लक्झरी ब्रँड्सचा समावेश असेल. या दोन्ही कंपन्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर स्वतंत्रपणे सूचीबद्ध केल्या जातील.
गुंतवणूकदारांना काय फायदा होईल?हा डिमर्जर गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी आहे.
- १:१ च्या प्रमाणात शेअर्सचे वाटप: टाटा मोटर्सच्या गुंतवणूकदारांना डिमर्जरच्या तारखेला त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरसाठी नवीन कंपनीचा एक शेअर दिला जाईल.
- स्वतंत्र गुंतवणुकीची संधी: गुंतवणूकदार आता व्यावसायिक वाहन युनिट आणि प्रवासी वाहन युनिट या दोन्हीमध्ये स्वतंत्रपणे गुंतवणूक करू शकतील. यामुळे त्यांना दोन्ही विभागांच्या कामगिरीनुसार निर्णय घेणे सोपे जाईल.
- पारदर्शकता: दोन स्वतंत्र कंपन्या झाल्यामुळे प्रत्येक विभागाच्या कामगिरीची आणि आर्थिक स्थितीची माहिती अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होईल.
कंपनी लवकरच एक 'रेकॉर्ड डेट' जाहीर करेल, ज्यामुळे या डिमर्जरसाठी पात्र गुंतवणूकदार कोण आहेत, हे स्पष्ट होईल. यानंतर शेअर एक्स-ट्रेड केला जाईल, ज्यामुळे त्याची किंमत समायोजित होईल.