Join us  

सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटी रुपये स्वाहा; जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 2:36 PM

योग गुरू बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला.

Supreme Court Patanjali: योग गुरू बाबा रामदेव यांना मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांची कंपनी 'पतंजली'च्या जाहिरातींबाबत एक नोटीस बजावली, ज्यामुळे बुधवारी(दि.28) पतंजली फूड्सचे शेअर्स सुमारे 4 टक्के घसरले आणि अवघ्या 105 मिनिटांत बाबा रामदेव यांच्या कंपनीला सुमारे 2300 कोटी रुपयांचा फटका बसला. सुप्रीम कोर्टाने नोटीस का बजावली आणि हे प्रकरण काय आहे, जाणून घ्या.

कंपनीचे शेअर सुमारे 4 टक्क्यांनी घसरले

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पतंजली आयुर्वेद आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयाच्या मागील आदेशाचे उल्लंघन करणे आणि औषधांच्या जाहिरातींमध्ये "भ्रामक दावे" केल्याप्रकरणी नोटीस पाठवली. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर दिसून आला. बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 4 टक्क्यांची घसरण झाली आणि कंपनीचा शेअर 1556 रुपयांवर आला. तर एक दिवस आधी कंपनीचे शेअर्स 1620.20 रुपयांवर होते. सध्या कंपनीचे मूल्य 56,471.20 रुपये आहे.

कोणत्या जाहिरातींवर बंदी घातली?सुप्रीम कोर्टाने पतंजलीला हृदयविकार आणि दमा यांसारखे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरात करण्यास मनाई केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने कोर्टात पुरावे सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये द हिंदू वृत्तपत्रातील पतंजलीची जाहिरात आणि एका पत्रकार परिषदेत कंपनीने योगाच्या मदतीने मधुमेह आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला होता. 

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :रामदेव बाबापतंजलीसर्वोच्च न्यायालयशेअर बाजारव्यवसाय