Share Market Crashed : जागतिक तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीतील भडका आणि परदेशी गुंतवणूकदारांची तुफान विक्री या तिहेरी संकटामुळे भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठा भूकंप आला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी २ टक्क्यांनी कोसळले. या भीषण पडझडीमुळे गुंतवणूकदारांची सुमारे ८ लाख कोटी रुपयांची संपत्ती काही तासांतच पाण्यात गेली आहे.
बाजारातील पडझडीचे प्रमुख आकडेसेन्सेक्स १७१० अंकांनी घसरून ७८,५२९ वर पोहोचला. एप्रिल २०२५ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. निफ्टी ५० ४७७ अंकांनी घसरून २४,३८९ वर आला. गेल्या सात महिन्यांत पहिल्यांदाच निफ्टी २४,४०० च्या खाली गेला आहे. बीएसईमध्ये सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल घटून ४४९ लाख कोटी रुपयांवर आले आहे.
घसरणीची मुख्य कारणेबाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- इराण-इस्राईल संघर्ष: अमेरिका आणि इस्राईलने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे जागतिक बाजारपेठा हादरल्या आहेत. युद्धाची व्याप्ती वाढल्यास तेल पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.
- कच्च्या तेलाचा भडका: जगातील २०% तेल पुरवठा 'होर्मुझ' सामुद्रधुनीतून होतो. या मार्गावर युद्धामुळे धोका निर्माण झाल्याने ब्रेंट क्रूड ८२ डॉलरच्या पार गेले आहे. भारत आपल्या गरजेच्या ८५% तेल आयात करतो, त्यामुळे तेल महागल्यास महागाई वाढण्याचा मोठा धोका आहे.
- रुपयाची ऐतिहासिक घसरण: डॉलरच्या तुलनेत रुपया ९२.०५ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांची पाठजागतिक अनिश्चिततेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढणे सुरूच ठेवले आहे. देशांर्गत गुंतवणूकदार खरेदी करून बाजार सावरण्याचा प्रयत्न करत असले तरी, जागतिक दबावापुढे ते तोकडे पडत असल्याचे चित्र आहे.
वाचा - विमानं ठप्प, तेल महागलं! युद्धामुळे जागतिक अर्थकारण धोक्यात; गुंतवणूकदारांकडे कोणते पर्याय?
पुढे काय? तज्ज्ञांचा अंदाजजर इराण-इस्राईल युद्ध दीर्घकाळ खेचले गेले, तर बाजारातील ही अस्थिरता कायम राहू शकते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाची घसरण यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी सध्या घाईघाईत मोठी गुंतवणूक करण्याऐवजी 'थांब आणि वाट पाहा' हे धोरण स्वीकारणे हिताचे ठरेल.
Web Summary : Global tensions and rising oil prices triggered a massive market crash. Investors lost ₹8 lakh crore as Sensex and Nifty plummeted. The Iran-Israel conflict, crude oil surge, and rupee's fall fueled the downturn. Experts advise caution amidst uncertainty.
Web Summary : वैश्विक तनाव और बढ़ते तेल के दामों के कारण बाजार में भारी गिरावट आई। सेंसेक्स और निफ्टी के गिरने से निवेशकों को ₹8 लाख करोड़ का नुकसान हुआ। ईरान-इजराइल संघर्ष, कच्चे तेल की कीमतों में उछाल और रुपये में गिरावट ने मंदी को बढ़ावा दिया। विशेषज्ञ अनिश्चितता के बीच सावधानी बरतने की सलाह देते हैं।