Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदारांवर आणली डोकं धरण्याची वेळ, १३% नं आपटला; का होतेय विक्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 15:38 IST

Multibagger Stock: हा स्टॉक आपल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तराच्या अगदी जवळ पोहोचलाय. पाहा काय आहे यामागचं कारण?

Multibagger Stock: तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात शक्ती पंप्स इंडियाच्या (Shakti Pumps) शेअर्सवर मोठा परिणाम दिसून येत आहे. कंपनीचा शेअर आज १३ टक्क्यांनी कोसळला असून, यामुळे बीएसई (BSE) वर हा स्टॉक आपल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तराच्या अगदी जवळ पोहोचलाय. शक्ती पंप्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५४९ रुपये प्रति शेअर आहे. आज सकाळी बीएसईवर कंपनीचा शेअर ५६५.९० रुपयांच्या स्तरावर उघडला होता, मात्र काही वेळातच तो १२.८० टक्क्यांच्या घसरणीसह ५५८ रुपयांवर आला. विशेष म्हणजे, दिवसाच्या सुरुवातीला हा शेअर ५९० रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. कामकाजाच्या अखेरिस हा शेअर ५६६ रुपयांवर आला.

निव्वळ नफ्यात ७० टक्क्यांची प्रचंड घट

शक्ती पंप्सच्या निव्वळ नफ्यात या तिमाहीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा ६९.६० टक्क्यांनी कमी झालाय. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ३१.७० कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत १०४.१० कोटी रुपये होता. नफ्यातील ही मोठी घट कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारी ठरली आहे.

MCX वर घसरण, पण सराफा बाजारात मात्र सोनं महागलं; पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

महसूलामध्येही घसरण

कंपनीला केवळ निव्वळ नफ्यातच नव्हे, तर महसुलाच्या आघाडीवरही मोठा झटका बसलाय. कंपनीचा महसूल १५.१० टक्क्यांनी कमी होऊन ५५१ कोटी रुपयांवर आला. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत हा महसूल ६४८.८० कोटी रुपये इतका होता. त्याचप्रमाणे, वार्षिक तत्त्वावर इबिट्डा (EBITDA) मध्ये ६१.८० टक्क्यांची घसरण झाली असून तो ५९ कोटी रुपयांच्या स्तरावर आला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात १५४.४० कोटी रुपये होता.

शेअरची कामगिरी आणि परताव्याचा इतिहास

शक्ती पंप्सचा शेअर गेल्या एका वर्षापासून बाजारात संघर्ष करत आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३२ टक्क्यांची घसरण झाली आहे, तर याच काळात सेन्सेक्स निर्देशांकात ९.२३ टक्क्यांची वाढ दिसून आली. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे. दोन वर्षांत या स्टॉकनं पोझिशनल गुंतवणूकदारांना १३३ टक्के परतावा दिला आहे. तसेच गेल्या तीन वर्षांत ७३१ टक्के, ५ वर्षांत ५५२ टक्के आणि १० वर्षांत ३२३० टक्क्यांचा बंपर परतावा या शेअरने दिला आहे.

बोनस शेअर्स आणि लाभांशाची माहिती

कंपनीने २०२४ मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर ५ बोनस शेअर्स दिले होते. तसंच २०२५ मध्ये कंपनीनं आपल्या शेअरधारकांना प्रति शेअर १ रुपयाचा लाभांशदेखील दिला होता. सध्याच्या घसरणीमुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता असली तरी कंपनीचा दीर्घकालीन परताव्याचा इतिहास प्रभावी राहिला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Shakti Pumps Stock Plummets: Investors Worry After 13% Drop

Web Summary : Shakti Pumps shares crashed 13% after disappointing quarterly results, nearing a 52-week low. Net profit fell 70%, revenue declined 15%, and EBITDA dropped 61.8%. While short-term performance is weak, the stock has delivered substantial long-term returns, including bonuses and dividends.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा