Join us

₹२८ चा शेअर वर्षभरापासून करत होता मालामाल, एका वृत्तानं बिघडवला गुंतवणूकदारांचा मूड; शेअर आपटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 13:23 IST

गेल्या वर्षभरापासून रिलायन्स पॉवरच्या शेअरनं गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. दरम्यान, डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा आणखी वाढला आहे.

Reliance Power Share Price: डिसेंबर तिमाही निकालानंतर, रिलायन्स पॉवर लिमिटेडचे ​​शेअर्स सोमवारी (5 फेब्रुवारी 2024) 5 टक्क्यांनी घसरले. या मोठ्या घसरणीनंतर बीएमएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 27.36 रुपयांपर्यंत घसरली. गेल्या वर्षभरापासून रिलायन्स पॉवरच्या शेअरनं गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. दरम्यान, डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा आणखी वाढला आहे.  

वाढत्या खर्चामुळे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर, 2023) रिलायन्स पॉवर लिमिटेडचा एकत्रित निव्वळ तोटा वाढून 1,136.75 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 291.54 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीनं सांगितलं की, डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न किरकोळ वाढून 2,001.54 कोटी रुपये झालं, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,936.29 कोटी रुपये होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीचा खर्च वाढून 3,179.08 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2,126.33 कोटी होता. 

वर्षभरापासून करतोय मालामाल 

गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमती जवळपास 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी, गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. याचा अर्थ या तोट्यात चाललेल्या कंपनीनं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. मात्र, गेल्या एका महिन्यात हा शेअर सुमारे 13 टक्क्यांनी घसरला आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजाररिलायन्स