Join us

Reliance चे गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या चार दिवसात कमावले 1.64 लाख कोटी रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 17:44 IST

Reliance Share: गेल्या आठवड्यात रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली.

Reliance Share : पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे, परंतु या तणावाच्या काळातही भारतीय शेअर बाजारात सातत्याने वाढ होत आहे. गेला आठवडा गुंतवणूकदारांसाठी चांगला ठरला. सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 2.31 लाख कोटी रुपयांनी वाढले. विशेष म्हणजे या आकड्यापैकी निम्म्याहून अधिक रक्कम देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची आहे.

गेल्या आठवड्यात फक्त 4 दिवस व्यवहार गेल्या आठवड्यात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे शेअर बाजार फक्त चार दिवसांसाठी व्यवहारासाठी खुला होता. अशा परिस्थितीत, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक चार व्यवहार दिवसांत 1,289.46 अंकांनी किंवा 1.62 टक्क्यांनी वाढला. या काळात सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले, तर तीन कंपन्यांचे मूल्य घसरले.

कमाईत रिलायन्स अव्वल स्थानावर गेल्या आठवड्यात मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला आधार दिला. या काळात कंपनीचे शेअर्स जवळजवळ 7 टक्क्यांनी वाढले अन् शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 1422.50 रुपयांवर बंद झाले. तर गेल्या एका महिन्यात आरआयएलच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमुळे गेल्या आठवड्यात फक्त 4 दिवसांत कंपनीचे मार्केट कॅप 19.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. तसेच, या काळात रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी सुमारे 1.64 लाख कोटी रुपये कमावले.

या कंपन्यांनाही फायदा झालारिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त इतर नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलचे बाजार भांडवल 20,755.67 कोटी रुपयांनी वाढून 11.11 लाख कोटी रुपये झाले, तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 19,381.90 कोटी रुपयांनी वाढून 10.23 लाख कोटी रुपये झाले. याशिवाय, एचडीएफसी बँकेचे एमकॅप 11,514.78 कोटी रुपयांनी वाढून 14,73,356.95 कोटी रुपये झाले, तर इन्फोसिसचे बाजार भांडवल 10,902.31 कोटी रुपयांनी वाढून 6,25,668.37 कोटी रुपये झाले. 

टीसीएससह या कंपन्यांना धक्काबजाज फायनान्सचे मार्केट कॅप सर्वात जास्त 15,470.50 कोटी रुपयांनी घसरले, तर HUL चे मार्केट कॅप 1,984.41 कोटी रुपयांनी घसरले. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा ग्रुपच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मार्केट कॅपदेखील 1,284.42 कोटी रुपयांनी घसरले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीशेअर बाजार