Reliance Power Ltd : कधीकाळी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले उद्योगपती अनिल अंबानी आता पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांच्या काही कंपन्या आता कर्जमुक्त झाल्या आहेत आणि उरलेल्याही लवकरच होतील असा विश्वास त्यांना आहे. आता ते थेट आपले मोठे भाऊ मुकेश अंबानी यांच्या कंपनीला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. वास्तविक, मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ज्या क्षेत्रात काम करते, त्याच क्षेत्रात आता अनिल अंबानींना मोठा प्रकल्प मिळाला आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries Limited) नुकतेच सौर पॅनेल (solar panel) तयार करण्यासाठी पहिले युनिट सुरू केले आहे. त्यांची कंपनी गुजरातमधील जामनगरमध्ये ५,००० एकर जमिनीवर मोठे कारखाने बांधत आहे. तर दुसरीकडे अनिल अंबानी यांनीही हरित ऊर्जेला (green energy) प्रोत्साहन देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे रिलायन्स पॉवर लिमिटेड (Reliance Power Limited) या त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.
भूतान सरकारसोबत २००० कोटींचा करारअनिल अंबानी यांच्या कंपनीने भूतान सरकारच्या मालकीची कंपनी ग्रीन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड (Green Digital Private Limited - GDL) सोबत दीर्घकालीन वीज खरेदी करारासाठी (long-term power purchase agreement) करार केला आहे. ग्रीन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड ही भूतान सरकारची गुंतवणूक शाखा ड्रुक होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (Druk Holding & Investments Limited - DHI) च्या मालकीची आहे. या करारानुसार, रिलायन्स पॉवर भूतानमधील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प बांधणार आहे.
रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि ड्रुक होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड मिळून 50:50 भागीदारीत हा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करतील. या प्रकल्पाची क्षमता ५०० मेगावॅट असेल आणि बांधा, मालकी आणि चालवा या मॉडेलनुसार यासाठी २००० कोटी रुपये खर्च येणार आहे.
भूतानच्या सौर ऊर्जा क्षेत्रात ही आतापर्यंतची सर्वात मोठी खाजगी गुंतवणूक आहे. यामुळे भूतानला स्वच्छ ऊर्जा मिळेल आणि भारतासह इतर शेजारील देशांना वीज वाटणे शक्य होईल. ऑक्टोबर २०२४ मध्ये रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी ड्रुक होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड सोबत भागीदारी केली होती.
वाचा - दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
शेअर्समध्ये मोठी वाढया करारानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीचे शेअर्स ७.३२ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या महिन्यात ८.९२ टक्क्यांनी आणि गेल्या ६ महिन्यात २८.४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २ वर्षात या शेअरने २९९.८३ टक्क्यांचा मोठा परतावा दिला आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५४.२५ रुपये आहे, तर नीचांकी पातळी २३.२६ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप १८,४४१.९१ कोटी रुपये आहे. अनिल अंबानी यांच्या या नव्या निर्णयामुळे रिलायन्स पॉवरला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.