Join us

₹८२० वरून ₹१.७२ वर आला 'हा' शेअर, १ लाखांचे झाले २०९ रुपये; आता ट्रेडिंगही बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:26 IST

Reliance Communications Shares: असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. तर असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. पाहा कोणता आहे हा शेअर.

Reliance Communications Shares: असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. तर असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्सचं ट्रेडिंग सध्या बंद आहे. २० जानेवारी रोजी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून १.७२ रुपयांवर बंद झाला. शेअरची किंमत सध्या २००८ च्या उच्चांकी पातळीपेक्षा ९९ टक्क्यांनी खाली आली आहे. १० जानेवारी २००८ रोजी हा शेअर ८२०.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदारानं त्यावेळी या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आतापर्यंत गुंतवणूक केली असती तर ही रक्कम आज २०९ रुपयांवर आली असती.

शेअरची स्थिती काय?

कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असून तिच्यावर ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ११ टक्क्यांनी घसरलाय. त्यात एका महिन्यात २० टक्के आणि वर्षभरात ६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र, पाच वर्षांत हा शेअर जवळपास १०० टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत २.५९ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १.४७ रुपये आहे. सध्या कंपनीचं मार्केट कॅप ४७५ कोटी रुपये आहे. १० जानेवारी २००८ रोजी या शेअरचे मार्केट कॅप १.६४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले होतं.

कंपनी व्यवसाय

रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) ही एक भारतीय मोबाइल नेटवर्क प्रदाता कंपनी होती ज्याचं मुख्यालय नवी मुंबईत होतं. ही कंपनी व्हॉईस आणि २जी आणि ३जी आणि ४जी डेटा सेवा प्रदान करत होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये कंपनीनं दिवाळखोरीसाठी अर्ज केला, कारण त्यांना कर्ज फेडण्यासाठी मालमत्ता विकता आली नाही. रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड ही रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी होती.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसाअनिल अंबानी