Join us  

पतंजली जाहिरात प्रकरण: बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, शेअर आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 1:26 PM

सर्वोच्च न्यायालयानं एका खटल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचर्य बाळकृष्ण यांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे

मंगळवारी कामकाजादरम्यान पतंजली फूड्सचे शेअर्स इन्ट्रा डेमध्ये ५.२६ टक्क्यांनी घसरले. खरं तर सर्वोच्च न्यायालयानं एका खटल्याप्रकरणी बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचर्य बाळकृष्ण (Acharya Balakrishna) यांना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. हे प्रकरण अनेक आजार कायमचे बरे करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातींबाबतचं आहे. नियमांचं उल्लंघन करून अशा जाहिराती सुरू ठेवल्याबद्दल न्यायालयानं बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू केली होती. न्यायालयानं बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना या कारवाईसंदर्भात उत्तर देण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. 

या आदेशाचा परिणाम पतंजली फूड्सच्या शेअर्सवरही दिसून आला. सकाळी बीएसईवर शेअर १४१०.१० रुपयांवर घसरून उघडला. दिवसभरात ते मागील बंद किमतीच्या तुलनेत ५.२६ टक्क्यांनी घसरून १३४२.०५ रुपयांवर आला. शेअरचा अपर प्राईज बँड १,६९९.९० रुपये आहे आणि लोअर प्राईज बँड १,१३३.३० रुपये आहे. तर या शेअरचं सर्किट लिमिट २० टक्के आहे. 

फेब्रुवारीत जारी केलेली नोटीस 

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, सर्वोच्च न्यायालयानं पतंजली आयुर्वेद आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४ आणि त्याच्या नियमांचे उल्लंघन करून उत्पादनांच्या जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल अवमान नोटीस जारी केली होती. 

गुंतवणूकदारांना मिळणार डिविडंड 

१३ मार्च रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ६ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश मंजूर करण्यात आला. कंपनीनं स्टॉक एक्सचेंजला सांगितले की ११ एप्रिल २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी पात्र भागधारकांना लाभांश दिला जाईल. पतंजली फूड्सचे शेअर्स २१ मार्च रोजी एक्स-डिविडंडचे ट्रेड करणार आहेत. या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असलेल्यांना डिविडंड मिळणार आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पतंजलीरामदेव बाबाशेअर बाजारसर्वोच्च न्यायालय