Pacheli Industrial Finance Ltd Share: पचेली इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेडचे शेअर्स सध्या सतत चर्चेत आहेत. सलग तीन दिवस कंपनीच्या शेअरला ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागत आहे. मंगळवारी हा शेअर ५ टक्के लोअर सर्किटसह ६७.०६ रुपयांवर घसरला. गेल्या तीन दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांची घसरण झालीये, तर महिनाभरात हा शेअर १९० टक्क्यांहून अधिक वधारलाय. सहा महिन्यांत ४२१ टक्के वाढ झाली. आता या शेअरमधील या घसरणीमागे सेबीची मोठी कारवाई आहे.
काय आहे प्रकरण?
एसएमई शेअर्सचा प्राइस टू अर्निंग (पी/ई) रेश्यो ४,००,००० च्या पातळीपेक्षा अधिक आढळल्यानंतर भांडवली बाजार नियामक सेबीने गुरुवारी सात कंपन्यांच्या व्यवहारांवर बंदी घातली. पचेली इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड (पीआयएफएल), अभिजीत ट्रेडिंग कंपनी, कॅलिक्स सिक्युरिटीज, हिबिस्कस होल्डिंग्स, एवेल फायनान्शियल सर्व्हिसेस, अॅडॉप्टिका रिटेल इंडिया आणि सल्फर सिक्युरिटीज या कंपन्यांवर सेबीनं बंदी घातली आहे. 'सातत्यानं शून्य महसुलाची नोंद करणारी एक कंपनी (पीआयएफएल) पाहिली आहे आणि या निधीचा वापर कसा केला जाईल हे स्पष्ट न करता अचानक १,००० कोटी रुपयांचं कर्ज काढलंय,' असं सेबीनं म्हटलंय.
काय आहेत डिटेल्स?
गेल्या तीन महिन्यांत कंपनीतील सार्वजनिक भागधारकांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. तसंच प्रिफरेंशियल अलॉटमेंटनुसार लॉक-इन ११ मार्च २०२५ रोजी संपणार आहे. असे शेअर्स खुल्या बाजारात विकले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. त्यामुळे या टप्प्यावर त्वरित कारवाई केल्यास तोटा टाळता येईल आणि मोठ्या प्रमाणात लोकांना शेअर्सकडे आकर्षित होण्यापासून रोखता येईल, असंही सेबीनं आपल्या निवेदनाद्वारे म्हटलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)