Join us

Ola Electric Share Price : तेजीदरम्यान Ola Electric च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोकं धरण्याची वेळ, स्टॉक ₹९० च्या जवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 13:59 IST

Ola Electric Share Price : ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. तेजीदरम्यान ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये पैसे गुंतवले त्यांचं मोठं नुकसान झालंय.

Ola Electric Share Price : ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी कंपनीच्या शेअरमध्ये ९ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. गेल्या ६ पैकी ५ ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे.

कंपनीचा शेअर आज बीएसईवर ९९.०६ रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत ८९.७१ रुपयांपर्यंत घसरली. त्यानंतर कामकाजादरम्यान तो ९० रुपयांपर्यंत गेला.

४० टक्क्यांपर्यंत अधिक घसरण

ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आला होता. कंपनीची इश्यू प्राइस ७६ रुपये होती. त्यानंतर काही दिवसांनी कंपनीच्या शेअरची किंमत दुपटीनं वाढली. कंपनीचा आजवरचा उच्चांकी स्तर १५७.४० रुपये आहे. पण त्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. ज्यामुळे हा शेअर ४३ टक्क्यांनी घसरला.

मार्केट शेअरमध्ये मोठी घसरण

वाहनच्या (VAHAN) आकडेवारीनुसार, ओएलच्या मार्केट शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये कंपनीचा मार्केट शेअर ५२ टक्के होता. जे सप्टेंबरमध्ये २७ टक्क्यांवर आले आहे. ओलाला बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर्सकडून कडवी टक्कर मिळत आहे. दोन्ही कंपन्यांचा मार्केट शेअर वाढला आहे. एप्रिलमध्ये त्यांचा मार्केट शेअर १२ टक्के होता, जो सप्टेंबरमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

ओला इलेक्ट्रिकनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॉस सेल सुरू केला आहे. कंपनीची एसआय एक्स स्कूटर ४९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. कंपनी यावर ४०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाइलेक्ट्रिक कार / स्कूटरशेअर बाजार