Join us

नफा वाढवण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने घेतला मोठा निर्णय; 500 कर्मचाऱ्यांवर होणार थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 16:53 IST

Ola Electric Layoff: ओला इलेक्ट्रिक सध्या तोट्यात आहे. परंतु, कंपनी मार्जिन सुधारण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी टाळेबंदी करणार आहे.

Ola Electric Update :ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी (Ola Electric Mobility) कंपनीमागील शुक्लकाष्ट संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. एकीकडे ग्राहकांच्या तक्रारी तर दुसरीकडे मार्जिनमध्ये घसरण आल्याने कंपनी दुहेरी संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ओलाने मोठा निर्णय घेतला आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीमध्ये कर्मचारी कपात करणार आहे. जेणेकरून मार्जिन सुधारण्यासोबतच ओला इलेक्ट्रिकचा नफ्यामध्ये वाढ होईल. ओला इलेक्ट्रिक कंपनीमध्ये नवीन रिस्ट्रक्चरिंग प्रक्रिया सुरू करणार आहे, ज्यामुळे ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.

सूत्रांचा हवाला देत मनीकंट्रोलने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की भाविश अग्रवाल यांची कंपनी ओला इलेक्ट्रिक नवीन रिस्ट्रक्चरिंग प्रक्रिया सुरू करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे विविध पदांवर काम करणाऱ्या ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळू शकते. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, कंपनी मार्जिन सुधारण्याच्या आणि नफा मिळविण्याच्या उद्देशाने कर्मचारी कपात करणार आहे. यापूर्वी, कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये IPO पूर्वी २ रिस्ट्रक्चरिंग प्रक्रिया केल्या होत्या. जुलै २०२२ मध्ये, कंपनीने यूज्ड कार व्यवसाय, क्लाउड किचन आणि किराणा वितरण व्यवसाय बंद केला. तेव्हा १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, तर EV व्यवसायासाठी कंपनीला ८०० लोकांना कामावर घ्यावे लागले. कामावर घ्यावे लागले होते.

गुरुवार २१ नोव्हेंबर २०२४ चे ट्रेडिंग सत्र ओला इलेक्ट्रिकसाठी खूप निराशाजनक ठरले आहे. ओला इलेक्ट्रिक शेअर ६६.८६ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आला. आजच्या सत्रात स्टॉक ३.०४ टक्क्यांच्या घसरणीसह ६७.२१ रुपयांवर बंद झाला. ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स सध्या त्याच्या IPO किंमत ७६ रुपयांच्या खाली व्यवहार करत आहेत.

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी ओला इलेक्ट्रिकने जाहीर केलेल्या निकालांनुसार, या तिमाहीत कंपनीचा महसूल ३८.५ टक्के वाढीसह १२४० कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत डिलिव्हरीमध्ये ७३.६ टक्के वाढ झाली आहे. दरवर्षी कंपनी ५६,८१३ युनिट्सवरून ९८,६१९ युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे.

टॅग्स :ओलाइलेक्ट्रिक कार / स्कूटरकर्मचारी