Join us

NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:07 PM

Share Market Lok Sabha 2024 : एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येईल, असा विश्वास दिग्गज गुंतवणूकदारानं व्यक्त केलाय.

सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. देशात सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यापैकी चार टप्प्यांचं मतदान पूर्ण झालं असून पाचव्या टप्प्याचं मतदान २० मे रोजी होणार आहे. दरम्यान, एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येईल आणि चांगली कामगिरी करेल, असा विश्वास ज्येष्ठ गुंतवणूकदार मार्क मोबियस (Mark Mobius) यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीही ते चांगले ठरणार असल्याचं ते म्हणाले.  

मोबियस यांनी सीएनबीसी-टीव्ही १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. ही बाजारासाठी चांगली बातमी असेल. इतकंच काय, तर अर्थव्यवस्थेसाठी ते चांगलं ठरणार असल्याचं मोबियस म्हणाले. भारतीय शेअर बाजारात एवढी अस्थिरता का आहे आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) एवढी विक्री का करत आहेत, असा प्रश्न मोबियस यांना यावेळी विचारण्यात आला. 

मनीकंट्रोलनं दिलेल्या आकडेवारीनुसार, एफआयआयने मे महिन्यात आतापर्यंत निव्वळ ३३,५४० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत एफआयआयने सुमारे ६ अब्ज डॉलरची विक्री केली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसणाऱ्या अनिश्चिततेमुळे एफआयआयची विक्री होत असल्याची प्रतिक्रिया मॉबियस यांनी दिली. 

"कदाचित निवडणुकीच्या निकालाबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे हे घडलं असावं. परदेशी असोत किंवा भारतीय गुंतवणूकदार असो, सर्वच गुंतवणूकदार अनिश्चिततेचा तिरस्कार करतात. त्यांना भविष्याविषयी काहीही अनिश्चितता नको असते," असं त्यांनी नमूद केलं. 

धोरणांवर पुढे जाण्यास मदत होणार 

एनडीए सरकार परत आल्यास सरकारला आपल्या महत्त्वाकांक्षी धोरणांवर पुढे जाण्यास मदत होईल आणि यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये विकास, तंत्रज्ञानाचा अवलंब वाढण्यास मदत होईल, असे मोबियस यांनी नमूद केलं. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनुकूल वातावरणाची आवश्यकता आहे, ज्यात सरकारची महत्त्वाची भूमिका आहे, असेही त्यांनी नमूद केलं. 

"भारताला टेक इनोव्हेशन आणि टेक मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याची मोठी संधी आहे. चीन, तैवान, अमेरिका, जपान आदी देशांतील या बड्या कंपन्यांना भारत सरकार कितपत आकर्षित करू शकते, यावर हे अवलंबून असेल. भारत सरकारनं निर्माण केलेल्या वातावरणाचा परिणाम नक्कीच होईल. मला विश्वास आहे की मोदी सरकार कदाचित ते अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करेल आणि अनेक निर्बंध शिथिल करेल, ज्यामुळे अधिक परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होतील," असंही मोबियस यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :शेअर बाजारनरेंद्र मोदीलोकसभा निवडणूक २०२४