Join us

'या' कंपनीचा व्यवसाय खरेदी करणार अदानी? दिग्गज उद्योजकासोबत चर्चा, १३ टक्क्यांनी शेअर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 11:41 IST

एका सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एका वृत्तामुळे ही वाढ झाल्याचं म्हटलं जातंय.

Orient Cement share: ओरिएंट सिमेंटचे शेअर्स बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंग दिवशी १३ टक्क्यांनी वाढले. या वाढीचं कारण कंपनीशी संबंधित एक बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओरिएंट सिमेंटचे प्रवर्तक सीके बिर्ला यांनी गौतम अदानी यांच्याकडे लिस्टेड सिमेंट कंपनीतील हिस्सा विकण्यासाठी संपर्क साधला आहे. या बातमीनंतर कंपनीचा शेअर २१४.९५ रुपयांवर पोहोचला. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे.बिर्ला आणि अदानी समुहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संभाव्य व्यवहारावर चर्चा केल्याचं वृत्त ईटीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. रिपोर्टनुसार अदानींसोबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. परंतु या डील बाबत कोणतीही हमी नाही. बिर्लांनी व्हॅल्युएशनची केलेल्या मागणीमुळे ही डील अडकण्याचीही शक्यता आहे.सिमेंट व्यवसायात अदांनींचा बोलबालाअदानी समुहाची कंपनी अदानी सिमेंटनं नुकतंच सांघी इंडस्ट्रीजचं अधिग्रहण केलंय. अदानी सिमेंटची एकूण क्षमता ११० मिलियन टन आहे. ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्षमता आहे. ओरिअंट सिमेंटबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये जून तिमाहीपर्यंत सीके बिर्ला यांची ३७.९ टक्के भागीदारी होती.सीके बिर्ला समूह हा ऑटो सहाय्यक उत्पादनं, इमारत बांधकाम उत्पादनं, अभियांत्रिकी उत्पादनं, सिमेंट, कागद, पंखे आणि इलेक्ट्रिकल वस्तू यांसारख्या विविध उद्योगांमध्ये उपस्थिती असलेला एक औद्योगिक समूह आहे. प्रवर्तक जवळपास चार दशकांपासून सिमेंटचा व्यवसाय करत आहेत. ओरिएंट सिमेंटची प्रमुख बाजारपेठ महाराष्ट्र आणि त्यानंतर तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आहे. कंपनीची गुजरातमध्येही काही प्रमाणात उपस्थिती आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार