Page Industries : तुम्हाला जॉकी नावाचा इनरवेअर ब्रँड नक्कीच माहिती असेल. कदाचित तुम्ही या कंपनीच्या इनरवेअर वापरतही असाल. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या इनरवेअर ब्रँडच्या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे! गेल्या काही महिन्यांपासून जॉकी ब्रँड बनवणाऱ्या पेज इंडस्ट्रीज या कंपनीचा शेअर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना फक्त एका महिन्यात चांगला परतावा देऊन आश्चर्यचकित केले आहे.
एका महिन्यात प्रति शेअर २००० रुपयांचा नफाआज, १७ सप्टेंबर रोजी पेज इंडस्ट्रीजचा शेअर ०.६८% च्या वाढीसह ४५,६१४.४५ रुपयांवर व्यवहार करत होता. विशेष म्हणजे, गेल्या फक्त एका महिन्यात या शेअरने जवळपास ४.५८% चा परतावा दिला आहे, म्हणजेच प्रति शेअर जवळपास २००० रुपयांचा फायदा झाला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे या कंपनीचे केवळ १०० शेअर्स असते, तर त्यांना एकाच महिन्यात सुमारे २ लाख रुपयांची कमाई झाली असती.
कंपनीची आर्थिक स्थिती आणि लाभांशआजच्या आकडेवारीनुसार, पेज इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ५०,८७७.७८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने ५०,४७०.६० रुपयांचा उच्चांक आणि ३८,९०९.६० रुपयांचा नीचांक गाठला आहे. गुंतवणूकदारांसाठी कमाईची ही एकच संधी नाही. कंपनीने नुकताच प्रति शेअर १५० रुपयांचा अंतरिम लाभांश (डिव्हिडंड) जाहीर केला होता. याचा अर्थ, जर तुमच्याकडे १०० शेअर्स असतील तर तुम्हाला थेट १५,००० रुपयांचा लाभांश मिळाला असता.
पहिल्या तिमाहीत कंपनीला मोठा नफाशेअरमध्ये झालेल्या या वाढीमागे कंपनीचे उत्कृष्ट आर्थिक निकाल प्रमुख कारण आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २१.५% नी वाढून २००.७९ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत १६५.२२ कोटी रुपये होता. इतकेच नाही, तर कंपनीचा महसूल देखील ३% नी वाढून १,३१६.५६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
उत्कृष्ट आर्थिक कामगिरी आणि लाभांशाची घोषणा यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढला असून, त्याचा परिणाम शेअरच्या किमतीतील वाढीत दिसून येत आहे.