IT Stocks Rally : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. या तेजीला प्रमुख कारण ठरले आहे आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स. बाजारात आयटी स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी सुरू असून, इन्फोसिस आघाडीवर आहे. सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला असून, निफ्टी ५० देखील २५ हजारच्या पातळीजवळ व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर ही तेजी आली आहे.
आयटी शेअर्स का वधारले?शेअर बाजारात सध्या प्रमुख आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी सुरू आहे. यात इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर्स सुमारे अडीच टक्क्यांनी वाढले आहेत, तर टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक सुमारे २ टक्क्यांनी तर विप्रोचे शेअर्स ३ टक्क्यांनी वधारले आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारातील या तेजीचे मुख्य कारण अमेरिकेत संभाव्य व्याजदर कपात आहे. यामुळे भारत सारख्या विकसनशील बाजारपेठांना थेट फायदा होतो आणि परदेशी गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित होतात.
तज्ज्ञ काय म्हणतात?गेल्या काही सत्रांपासून विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेत होते. ते सतत शेअर्सची विक्री करत होते. पण आता यूएस फेडच्या रेट कपातीच्या संकेतांमुळे भारतीय बाजारात खूप सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जियोजित इन्व्हेस्टमेंट्सचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट डॉ. विजय कुमार यांचे म्हणणे आहे की, यूएस फेडच्या प्रमुखांनी सप्टेंबर महिन्यात व्याजदरात कपात करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दुसरीकडे, जपानपासून हाँगकाँगपर्यंत संपूर्ण आशियाई बाजारपेठेतही तेजी दिसून आली आहे.
वाचा - २ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)