Join us

रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 15:04 IST

Reliance Industries : रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड तिच्या उपकंपन्या आणि शाखांद्वारे देशभरात किराणा, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, जीवनशैली आणि औषध क्षेत्रात सुमारे १९,३४० स्टोअर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म चालवते.

Reliance Industries : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स उद्योग समूह सध्या वेगाने विस्तारत आहे. टेलिकॉम आणि गुंतवणूक क्षेत्रानंतर आता रिलायन्सने आणखी एका मोठ्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. रिलायन्स रिटेलने अमेरिकेची प्रसिद्ध रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन बनवणारी कंपनी 'केल्व्हिनेटर'चे अधिग्रहण केले आहे. वेगाने वाढणाऱ्या टिकाऊ ग्राहक वस्तूंच्या बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी रिलायन्सने हे पाऊल उचलले आहे.

रिलायन्स रिटेलची धुरा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी सांभाळत आहेत. या अधिग्रहणाची नेमकी आर्थिक माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही.

केल्व्हिनेटर : एक जुना आणि विश्वसनीय ब्रँडकेल्व्हिनेटर ही एक अमेरिकन कंपनी आहे, जी २० व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली. विशेष म्हणजे, १९७० आणि ८० च्या दशकात "द कूलस्ट वन" या टॅगलाइनमुळे केल्व्हिनेटर भारतात घराघरात पोहोचले होते. आजही भारतीय ग्राहकांमध्ये या नावाबद्दल एक आठवण आणि विश्वास आहे. हा ब्रँड त्याच्या टिकाऊ आणि चांगल्या कामगिरी करणाऱ्या उपकरणांसाठी ओळखला जातो, तसेच विश्वासार्हता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या किमतींसाठी तो प्रसिद्ध आहे.

रिलायन्स रिटेलने म्हटले आहे की, केल्व्हिनेटरला रिलायन्समध्ये विलीन करून, त्यांचे मोठे रिटेल नेटवर्क केल्व्हिनेटरच्या नावीन्यपूर्ण आणि विश्वसनीय कामगिरीच्या वारशाशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

ईशा अंबानी काय म्हणाल्या?रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या (RRVL) कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी या अधिग्रहणाबद्दल बोलताना सांगितले, “प्रत्येक भारतीयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान सोपे, अर्थपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज बनवणे हे आमचे ध्येय नेहमीच राहिले आहे. केल्व्हिनेटरचे अधिग्रहण हा एक महत्त्वाचा क्षण आहे, जो आम्हाला भारतीय ग्राहकांपर्यंत विश्वासार्ह जागतिक नवोपक्रमांची पोहोच वाढविण्यास सक्षम करतो.”

वाचा - मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही

रिलायन्सच्या एन्ट्रीने स्पर्धा वाढणाररिलायन्स रिटेलने स्पष्ट केले आहे की, ते ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करून, बाजारपेठेत वेगाने वाढ करण्यासाठी आणि भारतातील बदलत्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत दीर्घकालीन संधी शोधण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. केल्व्हिनेटरच्या ब्रँड वारशाचा फायदा घेऊन रिलायन्स रिटेल आता रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनपासून एअर कंडिशनर आणि स्वयंपाकघरातील इतर उपकरणे अशा प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये आपल्या उत्पादनांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. या अधिग्रहणामुळे भारतीय ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारात मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सअमेरिकाईशा अंबानीशेअर बाजार