Join us

ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 10:38 IST

Nifty Above 54000: देशांतर्गत ब्रोकरेज फर्मनं भारतीय शेअर बाजाराच्या भविष्याबद्दल अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आशावादी अंदाज व्यक्त केला आहे. पाहा काय म्हटलंय ब्रोकरेजनं.

Nifty Above 54000: देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठीनं भारतीय शेअर बाजाराच्या भविष्याबद्दल अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आशावादी अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क इंडेक्स निफ्टी ५० पुढील पाच वर्षांमध्ये ५०,००० अंकांचा ऐतिहासिक स्तर पार करेल. ब्रोकरेज फर्मच्या विश्लेषणानुसार, निफ्टी ५० इंडेक्स २०३० पर्यंत ४२,००० ते ५४,००० च्या स्तरादरम्यान पोहोचू शकतो.

भारतीय बाजाराची उत्कृष्ट कामगिरी

भारतीय शेअर बाजारानं बहुतेक जागतिक प्रतिस्पर्धकांपेक्षा चांगली कामगिरी केली असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलंय. २०२० ते २०२५ दरम्यान डॉलरच्या स्वरूपात या बाजारानं सुमारे १७ टक्के सरासरी वार्षिक परतावा दिला आहे. विश्लेषकांना विश्वास आहे की, भारताचा विकास संरचनात्मक सुधारणा, मजबूत उपभोग प्रवृत्ती आणि सुधारित कॉर्पोरेट नफ्याची क्षमता यांसारख्या मजबूत आधारांवर पुढे जात असल्यानं, ही गती कायम राहील.

वाढीला चालना देणारे प्रमुख घटक

ब्रोकरेज फर्मनं भारतीय बाजाराच्या या संभाव्य वाढीसाठी काही महत्त्वपूर्ण घटक अधोरेखित केले आहेत.

घरगुती मागणीवर आधारित विकास: भारताची वाढ प्रामुख्यानं घरातील मागणीवर आधारित आहे, जी वाढत्या उपभोग आणि गुंतवणुकीमुळे प्रेरित आहे. हा विकास केवळ निर्यातीवर अवलंबून नाही.

वाढता मध्यम आणि धनवान वर्ग: धनवान भारतीयांची संख्या २००० मधील २ कोटींवरून २०२४ मध्ये १५ कोटींवर पोहोचली आहे. २०३० पर्यंत हा आकडा २४ कोटींवर जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशात पर्चेसिंग पॉवर आणि मागणीला मोठं बळ मिळेल.

दारिद्र्य पातळीत घट: दारिद्र्य पातळीत वेगानं झालेली घट ही विकासासाठी पोषक आहे. केवळ ५ टक्के लोकसंख्याच ३ डॉलर प्रतिदिन या उत्पन्न मर्यादेखाली आहे, ज्यामुळे उपभोग-आधारित विस्तारासाठी मजबूत मध्यमवर्ग तयार झाला आहे.

गुंतवणुकीतील संरचनात्मक बदल: म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांनी इक्विटीमध्ये सातत्यानं गुंतवणूक वाढवली आहे, तर घरगुती गुंतवणूकदारांचा सहभाग दुप्पट झाला आहे. यामुळे बाजारात दीर्घकाळ स्थिरता येण्यास मदत मिळत आहे.

मजबूत व्यापक आर्थिक स्थिती: ६५० अब्ज डॉलरपेक्षा जास्त असलेला परकीय चलन साठा, मजबूत सेवा निर्यात आणि तेलावरील कमी झालेलं अवलंबित्व यामुळे भारताची व्यापक आर्थिक स्थिती मजबूत राहिली आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, भारतीय शेअर बाजार सध्या आपल्या जागतिक समकक्षांच्या तुलनेत प्रीमियम मूल्यांकनावर (Premium Valuation) व्यवहार करत आहे. आनंद राठीनं रुपयाची लवचिकता हा देखील एक महत्त्वाचा सकारात्मक घटक मानला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nifty Could Hit 54,000 in 5 Years, Experts Predict

Web Summary : Brokerage firm Anand Rathi predicts Nifty 50 could reach 54,000 by 2030, driven by strong domestic demand, a growing middle class, and structural reforms. India's economic resilience, coupled with increasing investment and a robust macroeconomic position, supports this optimistic outlook.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा