Join us

हिंडेनबर्गने या ३ अब्जाधीशांना केलं होतं टार्गेट! अदानींचे बुडाले १ लाख कोटी; इतर दोघांचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:13 IST

Hindenburg Research : अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने आपलं दुकान बंद केलं आहे. २०१७ ते २०२३ या कालावधीत कंपनीने अनेक अहवाल प्रसिद्ध करुन खळबळ उडवून दिली होती.

Hindenburg Research : जगभरातील काही अब्जाधीशांचा बाजार उठवायला निघालेल्या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने स्वतःच गाशा गुंडाळला आहे. २०१७ ते २०२४ या कालावधीत या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अहवालांनी खळबळ उडवून दिली होती. या काळात गौतम अदानी, जॅक डोर्सी आणि कार्ल इकान यांसारख्या जगातील आघाडीच्या अब्जाधीश उद्योगपतींचे सर्वाधिक नुकसान झाले. जानेवारी २०२३ मध्ये अदानी समुहाच्या विरोधात प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टने शेअर बाजारात गोंधळ उडाला होता. पण, हिंडनबर्गने जॅक डोर्सी आणि कार्ल इकान यांचे किती नुकसान केले हे तुम्हाला माहिती आहे का?

कार्ल इकान कोण आहेत?हिंडेनबर्गच्या अहवालामुळे प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार कार्ल इकान यांचेही मोठे नुकसान झाले. कार्ल इकान हे अमेरिकन शेअर बाजारातील एक मोठे नाव आहे. कार्ल यांची इकान इंटरप्राइजेज नावाची कंपनी आहे. ज्यामध्ये फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकही केली जाते. कार्ल हे जगाने पाहिलेल्या सर्वात यशस्वी हेज फंड व्यवस्थापकांपैकी एक असून वॉल स्ट्रीटवरील महान गुंतवणूकदारांपैकी एक मानले जातात. इकानने त्यांच्या गुंतवणूक आणि कॉर्पोरेट व्यवहारांद्वारे अफाट संपत्ती कमावली आहे. त्यांची एकूण संपत्ती ८.१ ते २४ अब्ज डॉलर्सदरम्यान असण्याचा अंदाज आहे.

हिंडेनबर्गने कार्ल इकान यांच्यावर कोणते आरोप केले?हिंडेनबर्ग रिसर्चने मे २०२३ मध्ये, आपल्या अहवालात कार्ल इकान यांची कंपनी पॉन्झी स्कीमसारखी योजना चालवत असल्याचा आरोप केला. ज्याद्वारे गुंतवणूकदारांना लाभांश दिला जात असल्याचा दावा करण्यात आला होता. हिंडेनबर्गच्या या रिपोर्टनंतर, कार्ल इकानच्या कंपनीचे मूल्य १० अब्ज डॉलर्स (८,६४,७१,५०,००,००० रुपये) पेक्षा जास्त कमी झाले. कारण, त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली.

जॅक डोर्सीही हिंडेनबर्गचा बळीअदानी समूहानंतर शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सीला आपला बळी बनवले. मार्च २०२३ मध्ये, जॅक डोर्सीच्या फर्म, ब्लॉकच्या शेअर्समध्ये २० टक्के घट झाली. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात आरोप केला आहे की ब्लॉक इंक आपल्या युजर्स आणि सरकारची फसवणूक करत आहे. यामध्ये डोर्सी यांच्यावर चुकीची आकडेवारी जाहीर करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला होता. ब्लॉक इंकची अर्ध्याहून अधिक खाती बनावट आहेत. परंतु, कंपनीने युजर्सची संख्या फुगवली असल्याचा दावा केला होता.

अशा फसवणुकीतून जॅक डोर्सीने ५ अब्ज डॉलर्सचे व्यावसायिक साम्राज्य उभारले असल्याचा आरोप हिंडनबर्ग यांनी केला होता. या अहवालानंतर, ब्लॉक इंकच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली, कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसात ६.५ अब्ज डॉलर्सने (५,६२,१२,८७,७५,००० रुपये) कमी झाले. 

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजारशेअर बाजार