Join us

एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 10:39 IST

HDFC bank bonus share: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेनं आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा कधी आहे रेकॉर्ड डेट.

HDFC bank bonus share: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेनं आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी २७ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. जी पुढील आठवड्यात आहे. आता गुंतवणूकदारांच्या मनात एक प्रश्न फिरत आहे की यावेळी एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल की नाही. एचडीएफसी बँकेनं आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

एकावर एक शेअर फ्री

एक्सचेंजला दिलेल्या माहितीत, एचडीएफसी बँकेनं म्हटलंय की एका शेअरवर एक शेअर बोनस दिला जाईल. गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी, कंपनीने २७ ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच, या दिवशी, ज्या गुंतवणूकदारांचं नाव एचडीएफसी बँकेच्या शेअर रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना बोनस शेअर्स मिळतील.

कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचा एक्स-डिविडेंड व्यवहार झाला होता. त्यानंतर कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ५ रुपये विशेष लाभांश दिला होता.

गुंतवणूक करणं योग्य ठरेल का?

ब्रोकरेज हाऊस आनंद राठीचे टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे म्हणतात, "चार्ट पॅटर्नवर १८५० रुपयांची महत्त्वाची पातळी ओलांडल्यानंतर एचडीएफसी बँकेचे शेअर्स मोठ्या तेजीसह पुढे जात आहेत. येत्या अल्पावधीत, हा शेअर २०५० ते २१०० रुपयांच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. तथापि, १८५० रुपयांचा स्टॉप लॉस कायम ठेवा."

१ वर्षात २० टक्क्यांची तेजी

शुक्रवारी बाजार बंद होताना, बीएसईमध्ये १.२८ टक्क्यांनी घसरल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या शेअर्सची किंमत १९६४.७५ रुपये होती. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमती २० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २०३६.३० रुपये आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १६१३.४० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १५,०८,३४६.३९ कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एचडीएफसीगुंतवणूकशेअर बाजार