Gensol Engineering : पैशाची हेराफेरी आणि आर्थिक फसवणुकीत अडकलेल्या जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेने (IREDA) बुधवारी या कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) मध्ये याचिका दाखल केली आहे. जेनसोलविरुद्ध एखाद्या कर्जदात्याने अशी कायदेशीर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही याचिका १४ मे २०२५ रोजी दाखल करण्यात आली असून, आयआरईडीएने जेन्सोल इंजिनिअरिंगकडून सुमारे ५१० कोटी रुपये येणे बाकी असल्याचे म्हटले आहे.
नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या IREDA या सरकारी संस्थेने सांगितले की, जेन्सोल इंजिनिअरिंगने त्यांची मोठी रक्कम अद्याप परत केलेली नाही, त्यामुळे दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याची गरज भासली आहे.
शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यताजेनसोल इंजिनिअरिंगचा शेअर २०२३ मध्ये उच्चांकी २३९० रुपयांवर पोहोचला होता, पण त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात घसरून आता ५९ रुपयांवर आला आहे. मागील दोन दिवसांपासून या शेअरमध्ये थोडी वाढ दिसत असली तरी, आता दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाल्याच्या बातमीमुळे पुन्हा मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. जेनसोल इंजिनिअरिंग प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहन (EV) भाड्याने देण्याच्या व्यवसायात गुंतलेली होती.
सेबीची कारवाई आणि संचालकांचा राजीनामायापूर्वीच, बाजार नियामक सेबीने आर्थिक अनियमितता आणि गंभीर त्रुटींच्या आरोपांनंतर जेनसोल इंजिनिअरिंग आणि त्यांचे मालक अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांना शेअर बाजारात कोणतीही खरेदी-विक्री करण्याची बंदी घातली होती. सेबीचा हा तात्पुरता आदेश एप्रिल २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता आणि तो अजूनही लागू आहे. या कारवाईमुळे कंपनीची प्रतिमा तर खराब झालीच, पण गुंतवणूकदारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेबीच्या आदेशानंतर जग्गी बंधूंनी १२ मे रोजी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. एकंदरीत, जेनसोल इंजिनिअरिंग सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. IREDA च्या दिवाळखोरीच्या याचिकेनंतर कंपनीचे भविष्य अंधारात दिसत आहे. गुंतवणूकदारांनी या घडामोडींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
वाचा - ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
मल्टीबॅगर परतावा दिलेला स्टॉक धडामजेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स उच्चांकावरून आता ९५ टक्क्यांहून अधिक आपटले आहेत. २४ जून २०२४ रोजी या मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स १,१२५.७५ रुपयांवर होते तर, आता गुरुवारी स्टॉक ५९ रुपयांवर ट्रेड करत आहेत. गेल्या एका वर्षात जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स ९३.३२ टक्क्यांनी घसरले असून ५२.८४ रुपये या स्टॉकचा सर्वकालीन नीचांक आहे. स्मॉलकॅप कंपनी जेनसोल इंजिनिअरिंगचे मार्केट कॅप २२८ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.