Gautam Adani : शेअर बाजारासोबत डॉलरच्या तुलनेत रुपया देखील घसरल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. परकीय गंगाजळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. परिणामी महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, रुपया घसरल्याने फक्त अर्थव्यवस्थाच नाही तर आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांना एक-दोन नव्हे तर तीन नुकसान सोसावे लागले आहे. देशाचे चलन कोसळल्याने एका अब्जाधीश व्यावसायिकाचे मोठे नुकसान कसे होऊ शकते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वात मोठी घट झाली आहे. हे पहिले मोठे नुकसान आहे. संपत्तीत घट झाल्याने अदानी जगातील टॉप २० अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. हा दुसरा तोटा आहे. तिसरा तोटा आणखीन धक्कादायक आहे. गौतम अदानी सध्या जगात सर्वाधिक पैसा गमावणारे उद्योगपती बनले आहे.
अदानीच्या संपत्तीत घटरुपयाच्या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत ५.०६ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती ६६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. प्रत्यक्षात रुपयाच्या घसरणीमुळे सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. ज्याचा तडाखा अदानी ग्रुपच्या शेअर्सलाही बसला. अदानी एंटरप्रायझेसपासून अदानी ग्रीनपर्यंत सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली.
टॉप २० यादीतून बाहेरअदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात ५ अब्ज डॉलर्सहून अधिक घट झाल्याने ते जगातील टॉप २० अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या क्रमवारीत जवळपास ३ स्थानांची घसरण झाली आहे. त्याआधी ते १९व्या स्थानावर होते. आता २२ व्या स्थानावर घसरले आहेत. ६६ अब्ज डॉलर्सची संपत्ती असूनही गौतम अदानी अजूनही आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. टॉप २० मध्ये सामील होण्यासाठी ७ ते ८ अब्ज डॉलर्सची आवश्यकता असेल. जे सध्या तरी थोडे कठीण वाटते. आगामी काळात गौतम अदानी यांच्या संपत्तीत चढउतार होऊ शकतात.
एका वर्षातील सर्वाधिक घसरणएका दिवसात सर्वाधिक पैसे गमावण्याच्या बाबतीत गौतम अदानी नंबर वन बनले आहेत. त्याचबरोबर चालू वर्षात सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या बाबतीतही ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अदानींचा हा तिसरा सर्वात मोठा तोटा आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत १२.७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ३ जूनपासून गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत सुमारे ४६ टक्के घट झाली आहे. ३ जून २०२४ रोजी गौतम अदानी यांची संपत्ती १२२ अब्ज डॉलरवर पोहोचली होती, जी ५६ अब्ज डॉलरने कमी झाली आहे.