Join us

परदेशी गुंतवणूकदारांची माघार; शेअर बाजारातून 1.21 लाख कोटी रुपये काढून चीनमध्ये पळाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:51 IST

विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याची दहा वर्षांतील ही दुसरी वेळ आहे.

FPI Indian Share Market:भारतीयशेअर बाजारात 2024 मध्ये खूप चढ-उतार पाहायला मिळाले. अनेकदा तर सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी घसरला. बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे, विदेशी गुंतवणूकदारांची (FPIs) माघार आहे. या वर्षी विदेशी गुंतवणूकदारांनीभारतीयशेअर बाजारातून 1,20,598 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आणि ही रक्कम चीनच्या शेअर बाजारात गुंतवली. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याची दहा वर्षांतील ही दुसरी वेळ आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी चीनकडे वळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, चीन सरकारचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनने अनेकवेळा प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली होती, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा चिनी अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढला आणि त्यांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून चीनच्या बाजारात गुंतवले.

चीनच्या प्रोत्साहन पॅकेजशिवाय इतरही कारणे होती, ज्यांच्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेतले. यामध्ये भारतीय शेअर बाजाराचे उच्च मूल्यमापन, अमेरिकन रोखे उत्पन्नात झालेली वाढ आणि दुसऱ्या तिमाहीतील कमाईतील घट होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत स्पष्टता येईपर्यंत परदेशी गुंतवणूकदार भारताबाबत सावध राहतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. पण, 2025 च्या उत्तरार्धात परकीय गुंतवणूक परत येईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

NSDL च्या म्हणण्यानुसार, गेल्या दशकात म्हणजेच गेल्या 10 वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याची ही दुसरी वेळ आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी 2024 मध्ये 1,20,598.42 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर 2022 मध्येही 1,50,250.17 कोटी रुपये काढले होते. एकीकडे परदेशी गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम काढून घेतली, तर दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम गुंतवली. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 2024 मध्ये $60 अब्ज (सुमारे 5.13 लाख कोटी) पेक्षा जास्त गुंतवणूक केली, ज्यामुळे बाजारपेठेत वाढ झाली आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकभारत