Elon Musk Vs Donald Trump : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बिनसल्यानंतर मस्क यांनी नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. मात्र, ही घोषणा गुंतवणूकदारांना आवडली नसल्याचे दिसत आहे. कारण, या घोषणेनंतर मस्क यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीत १५.३ अब्ज डॉलर्स (सुमारे १३,१०,९७,३१,०२,४५० रुपये) पेक्षा जास्त घट झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मस्क यांची एकूण संपत्ती आता ३८६ अब्ज डॉलर्सवर आली आहे. राजकारणात सक्रियपणे उतरल्यानंतर त्यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत असल्याचं दिसून येत आहे.
टेस्लाचे शेअर्स धडाधड कोसळलेट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांचा अमेरिकन शेअर बाजारावर परिणाम झाला. त्याचसोबत, मस्क यांनी स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा केल्यामुळे त्यांच्या प्रमुख कंपनी टेस्लाच्या शेअर्सना मोठा फटका बसला. बाजारातील आकडेवारीनुसार, टेस्लाचे शेअर्स जवळपास ८% नी घसरून २९१.६४ डॉलर प्रति शेअर झाले. दिवसभरात ते २८८.७७ डॉलरच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते.
७ लाख कोटी रुपयांचा टेस्लाला फटका टेस्लाच्या शेअर्समधील या घसरणीमुळे कंपनीच्या एकूण मूल्यातही मोठी घट झाली आहे. आकडेवारीनुसार, कंपनीचं मूल्यांकन ८२ अब्ज डॉलर्सने (सुमारे ७ लाख कोटी रुपये) कमी झालं आहे. ही रक्कम आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीइतकी आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा टेस्लाचं मूल्यांकन ९९४.३२ अब्ज डॉलर होतं, जे सोमवारी ९१२.६८ अब्ज डॉलरपर्यंत घसरलं. म्हणजेच कंपनीचं मूल्यांकन ८१.६४ अब्ज डॉलर्सने कमी झालं आहे.
वाचा - जेन स्ट्रीटमुळे ट्रेडिंग कंपन्यांत खळबळ; जागतिक कंपन्यांनी वापरलेले ‘ड्युअल-एंटिटी’ मॉडेल आले समोर
या घटनेमुळे इलॉन मस्क आणि त्यांच्या कंपन्यांसाठी पुढील काळ आव्हानात्मक असू शकतो, असं दिसतंय.