Join us

Elon Musk Networth : आता ५०० पारची घोषणा? इलॉन मस्क यांनी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा जगातील पहिला व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:21 IST

elon musk created history : ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, SpaceX च्या इनसाइडर ट्रेडिंग विक्रीमुळे इलॉन मस्क यांच्या नेट वर्थमध्ये अचानक ५० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ४३९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे.

elon musk created history :डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर सर्वात जास्त कोणाला फायदा झाला असेल तर ते नाव इलॉन मस्क आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांनी इतिहास रचला आहे. जगात ४०० अब्ज डॉलरची संपत्ती असलेले इलॉन मस्क हे एकमेव व्यक्ती आहेत. आजपर्यंत असा विक्रम कोणाच्याही नावावर नाही. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, SpaceX च्या इनसाइडर ट्रेडिंग विक्रीमुळे इलॉन मस्क यांच्या नेट वर्थमध्ये अचानक ५० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. शेअर बाजार बंद झाल्यानंतर आणि टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर इलॉन मस्क यांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत बुधवारी ६२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता ४४७ अब्ज डॉलर्स झाली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर इलॉन मस्क यांच्या संपत्तीत १८३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. दुसरीकडे, टेस्लाच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली आहे. ४ डिसेंबरपासून, टेस्लाच्या शेअर्समध्ये ७२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

संपत्तीत ६२ अब्ज डॉलर्सची वाढबुधवारी ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, SpaceX आणि त्याच्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे कर्मचारी आणि इतर अंतर्गत व्यक्तींकडून १.२५ अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स खरेदी करण्याचे मान्य केले आहे. या करारानंतर SpaceX चे मूल्य ३५० अब्ज डॉलर झाले आहे. जे जगातील सर्वात मोठे खासगी स्टार्टअप बनले आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, या डीलमुळे इलॉन मस्क यांच्या नेट वर्थमध्ये ५० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. दुसरीकडे, टेस्ला शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे इलॉन मस्क यांच्या संपत्तीतही वाढ झाली असून त्यांना १२ अब्ज डॉलर्सचा नफा झाला. अशा परिस्थितीत इलॉन मस्क यांनी एका दिवसात ६२ अब्ज डॉलर्सचा नफा कमावला. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती ४४७ अब्ज डॉलर झाली आहे.

१८३ अब्ज डॉलर्सची वाढमात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर इलॉन मस्क यांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. ५ नोव्हेंबर रोजी इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती २६४ अब्ज डॉलर होती. आता त्यांची एकूण संपत्ती ४४७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ इलॉन मस्क यांच्या संपत्तीत अल्पावधीतच १८३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर चालू वर्षात २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, १ जुलै २०२३ रोजी इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती १२६ अब्ज डॉलर होती. ज्यामध्ये सुमारे दीड वर्षात ३.५५ पट म्हणजेच २५५ टक्के वाढ दिसून आली आहे.

टेस्ला शेअर्स रेकॉर्ड पातळीवरदुसरीकडे, टेस्ला शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. बुधवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान, टेस्लाचे शेअर्स सुमारे ६ टक्क्यांनी वाढले आणि ४२४.८८ डॉलरच्या ऐतिहासिक उच्च पातळीवर पोहोचले. ४ नोव्हेंबरपासून टेस्ला शेअर्समध्ये चांगली वाढ होत आहे. ४ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत २४२.८४ डॉलर होती. ज्यामध्ये आतापर्यंत ७५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यूएस स्टॉक मार्केट बंद झाल्यानंतर, टेस्लाचे शेअर्स ५.९३ टक्क्यांच्या वाढीसह ४२४.७७ डॉलरवर बंद झाले.

आता ५०० अब्ज डॉलर्सवर लक्षआता इलॉन मस्क यांनी वर्ष संपण्यापूर्वी ५०० अब्ज डॉलर्सवर लक्ष ठेवले आहे. तिथे पोहोचण्यासाठी इलॉन मस्क यांच्याकडे १५ दिवसांपेक्षा जास्त वेळ असून फक्त ५३ अब्ज डॉलर्सची गरज आहे. याचा अर्थ ५०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्यासाठी इलॉन मस्क यांच्या संपत्तीत दररोज सरासरी २.७६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ करावी लागेल. ५ नोव्हेंबरपासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत दररोज सरासरी ५ अब्ज डॉलर्सची वाढ होत आहे. अशा स्थितीत मस्क यांची संपत्ती वर्षअखेरीस सहज ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाशेअर बाजार