Zomato CEO Lifestyle : झोमॅटोचे सीईओ आणि सह-संस्थापक दीपिंदर गोयल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका खाजगी जेटच्या बातमीमुळे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या आलिशान जीवनशैलीबद्दल सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, मी जेट खरेदी केलं नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मात्र, या अफवेनंतर गुगलवर त्यांच्या नावाने सर्च वाढले आहेत.
पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबात दीपिंदर गोयल यांचा जन्म झाला. पुढे चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमधून शिकण घेतलं. २००१ मध्ये त्यांनी आयआयटी दिल्लीत प्रवेश मिळवून २००५ मध्ये बी. टेक पदवी मिळवली. 'बेन अँड कंपनी'त काम करत असताना त्यांना झोमॅटो सुरू करण्याची कल्पना सुचली. आज ते केवळ एक यशस्वी उद्योजक नाहीत, तर त्यांची जीवनशैलीही एखाद्या सुपरस्टारसारखी आहे.
करोडो रुपयांची जमीन आणि सुपरकार्सचे कलेक्शन!हिंदुस्तान टाईम्स आणि इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, दिल्लीतील डेरा मंडी गावात दीपिंदर गोयल यांच्याकडे सुमारे ५ एकर जमीन आहे, ज्याची किंमत अंदाजे ७९ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांना महागड्या गाड्यांचाही प्रचंड हौस आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांचे कलेक्शन एखाद्या सुपरकार प्रदर्शनापेक्षा कमी नाही.
- फेरारी रोमा : किंमत सुमारे ४.७६ कोटी रुपये
- पोर्श ९११ टर्बो : किंमत सुमारे ३.३५ कोटी रुपये
- लॅम्बोर्गिनी उरुस : किंमत सुमारे ४.१८ कोटी रुपये
- टर्बो : किंमत सुमारे २.३१ कोटी रुपये
गुरुग्राममध्ये ५२ कोटींचे आलिशान अपार्टमेंट!दीपिंदर गोयल यांनी अलीकडेच गुरुग्राममधील सर्वात प्रीमियम निवासी प्रकल्पांपैकी एक असलेल्या डीएलएफ द कॅमेलियासमध्ये सुमारे ५२.३ कोटी रुपये किमतीचा एक सुपर-लक्झरी अपार्टमेंट खरेदी केला आहे. हे अपार्टमेंट १०,८१३ चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे, म्हणजेच ते एखाद्या मोठ्या बंगल्याएवढाच विशाल आहे. या घरात ५ वाहनांसाठी पार्किंगची सुविधा असून, ते एखाद्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. या कराराचा 'कन्व्हेयन्स डीड' मार्च २०२५ मध्ये नोंदणीकृत झाला होता, आणि गोयल यांनी यासाठी तब्बल ३.६६ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील भरली आहे.
२५७० कोटींची संपत्ती आणि स्टार्टअप्समधील गुंतवणूक!कोइमोईच्या अहवालानुसार, झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांची एकूण संपत्ती सुमारे २५७० कोटी रुपये आहे. झोमॅटोमध्ये त्यांचा सुमारे ५.५% हिस्सा आहे. याशिवाय, त्यांनी बिरा ९१, हायपरट्रॅक, टेराडो आणि स्क्वॉडस्टॅक सह इतर अनेक स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओवरून हे स्पष्ट होते की ते केवळ एक व्यावसायिक नाहीत, तर भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमला पाठिंबा देणारे एक अव्वल गुंतवणूकदार देखील आहेत.
वाचा - सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
एका साध्या कुटुंबातून येऊन, एका कल्पनेच्या जोरावर दीपिंदर गोयल यांनी हजारो कोटींचे साम्राज्य उभारले आहे.