Budget Flashback : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेव्हा आपला 'डिजिटल टॅब्लेट' घेऊन संसदेच्या पायऱ्या चढतात, तेव्हा संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्याकडे लागलेल्या असतात. आज २०२६ च्या अर्थसंकल्पाची धामधूम सुरू असताना, गुंतवणूकदारांच्या मनात २०२२ च्या त्या बजेटच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, ज्याने अवघ्या काही तासांत बाजाराला 'शॉक' दिला होता आणि नंतर तितक्याच वेगाने 'रिकव्हरी'ही दाखवली होती.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ लाईव्ह अपडेट्स इथे पहा.
'तो' ३०% टॅक्स अन् पडझडीचे सत्र
२०२२ च्या अर्थसंकल्पातील सर्वात धक्कादायक घोषणा होती ती म्हणजे क्रिप्टोकरन्सीवरील ३०% फ्लॅट टॅक्स. सरकारने केवळ कर लावला नाही, तर तोटा 'सेट-ऑफ' करण्याची सुविधाही नाकारली. यासोबतच प्रत्येक व्यवहारावर १% TDS लागू केल्याने उदयोन्मुख क्रिप्टो बाजाराची कंबरच मोडली.
बाजारातील भूकंप
या घोषणेनंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सरकार आता टेक आणि फिनटेक कंपन्यांवरही अशीच कडक पावले उचलणार का, या भीतीने सेंसेक्सने तब्बल २००० अंकांची गटांगळी खाल्ली. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढण्यास सुरुवात केल्याने ही घसरण अधिकच गडद झाली होती.
धक्क्यातून सावरत बाजाराने मारली 'यू-टर्न'
शेअर बाजाराचे वैशिष्ट्य असे की, तो धक्के लवकर पचवतो. बजेटमधील इतर सकारात्मक तरतुदी आणि सरकारच्या दीर्घकालीन विकासाच्या व्हिजनमुळे सत्राच्या अखेरीस बाजाराचे चित्र पूर्णपणे पालटले. सुरुवातीच्या हाहाकारानंतर सेंसेक्स ८४९.४० अंकांच्या वाढीसह ५८,८६२.५७ वर बंद झाला. निफ्टीनेही २३७ अंकांची कमाई करत १७,५७६.८५ ची पातळी गाठली.
वाचा - अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आता कितीला मिळणार? पाहा नवे दर
२०२६ कडून काय आहेत अपेक्षा?
२०२२ चा तो अनुभव पाहता, यावेळी गुंतवणूकदार अधिक सावध आहेत. 'कॅपिटल गेन्स टॅक्स'मध्ये कोणताही बदल होऊ नये आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जावा, अशी अपेक्षा दलाल स्ट्रीटला आहे.

