Budget 2025 : आजचा दिवस देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शनिवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून देशांतर्गत शेअर बाजाराला खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पात सरकारने केलेल्या घोषणा कमकुवत बाजाराला बुस्टर डोस देऊ शकतील का? याची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पीय भाषण सुरू होण्यापूर्वीच २ कंपन्यांचे शेअर्स अपर सर्किटला आले आहेत. तर काहींमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.
हे शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सला अप्पर सर्किट लागलं आहे. या शेअरवर सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलं आहे. हा शेअर ६१ रुपयांच्या वरच्या सर्किटवर लॉक झाला आहे.
दुसरी कंपनी के.पी. एनर्जी लि. आहे. याचा शेअर ५ टक्के वरच्या सर्किटमध्ये लॉक करण्यात आला आहे. KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड ही तिसरी कंपनी आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात २०२५ मध्ये सरकार हरित ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मोठी घोषणा करुन शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अर्थसंकल्पात हरित ट्रांजिशन निधीची स्थापना केली जात आहे, ज्या अंतर्गत ५०,००० ते ६०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रमुख उद्योगांना जीवाश्म इंधनापासून अक्षय ऊर्जेकडे वळवणे, हा सरकारचा उद्देश आहे.
याव्यतिरिक्त, प्रत्येक घरात सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर योजनेचा विस्तार करण्याची सरकारची योजना आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक घरात सौर पॅनेल बसवले जातील. या उपक्रमासाठी बजेटमध्ये किमान १०,००० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
अदानी ग्रीन, टाटा पॉवर, एसजेव्हीएन, रिन्यू पॉवर, सोलर इंडस्ट्रीज आणि सुझलॉन एनर्जी यांसारख्या कंपन्यांना या योजनांचा मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. या पायऱ्यांद्वारे भारत सरकार २०७० पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती करत आहे.