Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 09:54 IST

Share Market Today: अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर बंदी घालण्याची धमकी दिली. याचे पडसाद सोमवारी बाजार उघडताच उमटले.

Share Market Today: अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर बंदी घालण्याची धमकी दिली. याचे पडसाद सोमवारी बाजार उघडताच उमटले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स १३९९.७७ अंकांनी घसरून ७६,१५०.४८ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसई (NSE) निफ्टी ५० देखील ४१०.३५ अंकांनी तुटून २३,६४०.२५ च्या पातळीवर आला.

शेअर्समध्ये मोठे चढ-उतार

बाजारातील या पडझडीत निफ्टीवर कोल इंडिया, ओएनजीसी आणि सन फार्मा या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स्, आयशर मोटर्स, इंटरग्लोब एव्हिएशन आणि श्रीराम फायनान्स या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहाराच्या सुरुवातीला अंदाजे ६१७ शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली, २२४६ शेअर्समध्ये घसरण झाली, तर १९६ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

रुपया ४९ पैशांनी घसरला

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ४९ पैशांनी घसरून ९३.३२ वर पोहोचला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकन चलनाच्या मजबुतीमुळे रुपयावर दबाव दिसून आला. तसंच जागतिक स्तरावरील भू-राजकीय अनिश्चिततेचाही परिणाम रुपयावर झाला आहे. परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इराण-अमेरिका शांतता चर्चा निष्फळ ठरल्यामुळे 'होर्मुजची सामुद्रधुनी' खुली राहण्याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे तेलाच्या किमती वाढल्या असून, देशांतर्गत शेअर बाजारातूनगुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्यामुळे रुपयावरचा दबाव आणखी वाढला आहे.

फॉरेक्स मार्केटमध्ये रुपया ९३.३० वर उघडला आणि लगेचच तो ९३.३२ पर्यंत घसरला, जी गेल्या बंद पातळीच्या तुलनेत ४९ पैशांची घसरण आहे. याआधी शुक्रवारी रुपया ३२ पैशांच्या घसरणीसह ९२.८३ प्रति डॉलरवर बंद झाला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Market Crash: Sensex Plunges After Trump's Threat; Nifty Below 24,000

Web Summary : Trump's threat regarding the Strait of Hormuz triggered a market sell-off. The Sensex plummeted 1400 points, and the Nifty fell below 24,000 due to rising crude oil prices. The rupee also weakened against the dollar amid geopolitical tensions, impacting investor sentiment and market volatility.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा