Join us

Bharat Global Developers : एका वर्षात दिला २३००% चा रिटर्न, आता मोठा झटका; SEBI नं थांबवलं 'या' शेअरचं ट्रेडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:33 IST

Bharat Global Developers : सेबीनं या कंपनीच्या शेअर्सचं ट्रेडिंग पुढील आदेशापर्यंत स्थगित केलं आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) कंपनीच्या प्रवर्तकांच्या भांडवली बाजारातील प्रवेशावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातलीये.

SEBI Suspended Trading : भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडचा शेअर (bharat global developers share) सोमवारी सुरुवातीच्या सत्रात पाच टक्क्यांनी घसरून १,२३६.४५ रुपयांवर पोहोचला. त्यामुळे कंपनीला मोठा धक्का बसला आहे. सेबीनं भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडच्या (GBD) शेअर्सचं ट्रेडिंग पुढील आदेशापर्यंत स्थगित केलं आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) कंपनीच्या प्रवर्तकांच्या भांडवली बाजारातील प्रवेशावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे. सीएनबीसी-टीव्ही 18 नं दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात इंडिया ग्लोबल डेव्हलपर्सच्या शेअर्समध्ये २३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

शेअरमध्ये १०५ पटींनी वाढ

बाजार नियामक सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय की, सोशल मीडिया पोस्ट, संशयास्पद आर्थिक आणि खुलाशांशी संबंधित १६ डिसेंबर २०२४ च्या तक्रारींची दखल घेतली आहे. नोव्हेंबर २०२३ ते २०२४ या कालावधीत भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडच्या शेअरमध्ये १०५ पटीनं वाढ झाली आहे. 

आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत इंडिया ग्लोबल डेव्हलपर्सचा महसूल, खर्च, स्थिर मालमत्ता आणि रोख प्रवाह खूपच कमी होता. दरम्यान, मार्च २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात आणि खर्चात झपाट्यानं वाढ झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये व्यवस्थापनातील फेरबदलानंतर, कंपनीच्या व्यवसायात विस्तार, मोठं प्रेफरन्शिअल अलॉटमेंट आणि हाय व्हॅल्यू डील्स दिसून आल्या. कंपनीनं ३० ऑक्टोबर २०२४ रोजी ६ नवीन युनिट्स तयार केले, असंही त्यात नमूद करण्यात आलंय.

वर्षभरात २३००% ची वाढ

गेल्या वर्षभरात भारत ग्लोबल डेव्हलपर्सचे शेअर्स २३०४ टक्क्यांनी वधारले आहेत. २६ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर ५१.४३ रुपयांवर होता. भारत ग्लोबल डेव्हलपर्सचा शेअर २३ डिसेंबर २०२४ रोजी सुरुवातीच्या सत्रात ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह १,२३६.४५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.या वर्षी आतापर्यंत इंडिया ग्लोबल डेव्हलपर्सच्या शेअर्समध्ये २१२२ टक्क्यांची वाढ झाली. तर गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ५३८% वाढ झाली. गेल्या ३ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ८७३१% वाढ झाली आहे. भारत ग्लोबल डेव्हलपर्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर १७०२.९५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५०.४३ रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारसेबी