Join us
Daily Top 2Weekly Top 5

जपानच्या दिग्गज कंपनीशी ८ वर्षांची मोठी डील; रॉकेट बनला 'हा' स्टॉक, सचिन तेंडुलकरचीही होती गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:26 IST

पाहा कोणती आहे ही कंपनी आणि का आलीये या स्टॉकमध्ये मोठी तेजी. शुक्रवारी बीएसईवर (BSE) इंट्राडे दरम्यान या कंपनीचा शेअर ८ टक्क्यांहून अधिक वाढून १६०० रुपयांवर पोहोचला.

देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीदरम्यान 'आझाद इंजिनिअरिंग'च्या (Azad Engineering) शेअरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी बीएसईवर (BSE) इंट्राडे दरम्यान या कंपनीचा शेअर ८ टक्क्यांहून अधिक वाढून १६०० रुपयांवर पोहोचला. जपानमधील दिग्गज कंपनी 'मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज' (MHI) सोबत ८ वर्षांचा करार आणि प्राइस एग्रीमेंट केल्यामुळे ही तेजी आली आहे. हा करार गॅस टर्बाइन इंजिनसाठी 'कॉम्प्लेक्स हॉट-सेक्शन नोजल व्हॅन सेगमेंट्स' पुरवण्याबाबत आहे.

जपानी कंपनीसोबतच्या कराराचा तपशील

आझाद इंजिनिअरिंगनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 'सिंगल-सोर्स सप्लायर' म्हणून निवड करण्यात आली आहे. हा करार मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजसोबतच्या भागीदारीचा विस्तार आहे. अ‍ॅडव्हान्स्ड गॅस टर्बाइन प्लॅटफॉर्मसाठी लागणाऱ्या कम्पोनंट्सचं उत्पादन मित्सुबिशीच्या समर्पित लीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये केलं जाईल. कंपनीनं या कराराला एक महत्त्वाचा टप्पा मानलं असून, यामुळे टर्बाइन उत्पादनातील अत्यंत महत्त्वाच्या आणि हाय-प्रिसिजन सेगमेंटमध्ये कंपनीचा प्रवेश होणार आहे.

लहान गुंतवणूकदारांच्या आवडत्या क्षेत्रावर मोठं संकट; १५ वर्षांतील सर्वात मोठ्या घसरणीकडे वाटचाल

क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरची मोठी गुंतवणूक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं हैदराबादस्थित या कंपनीवर मोठा विश्वास दाखवला होता. तेंडुलकरने २०२३ मध्ये आझाद इंजिनिअरिंगमध्ये ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावेळी त्याला प्रति शेअर ३,४२५ रुपये या दरानं शेअर्स मिळाले होते. त्यानंतर कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स दिल्यानं त्याला एका शेअरची किंमत ११४.४० रुपये पडली. त्याच्याकडे कंपनीचे ४,३८,२१० शेअर्स होते.

२८ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीची शेअर बाजारात आली आणि त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य ३१.५५ कोटी रुपये झालं. शेअरमधील वाढीमुळे काही दिवसांतच या गुंतवणुकीचे मूल्य ७२ कोटी रुपयांच्याही पुढे गेलं होतं. सध्या त्याची गुंतवणूक कायम आहे की नाही, याबद्दलची माहिती उपलब्ध नाही.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Azad Engineering stock soars after deal with Mitsubishi; Sachin Tendulkar invested.

Web Summary : Azad Engineering's stock surged after an 8-year deal with Mitsubishi Heavy Industries. The agreement involves supplying components for gas turbine engines. Sachin Tendulkar's past investment in the company further boosted investor confidence. The stock price increased significantly following the announcement.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसासचिन तेंडुलकर