Join us

Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:58 IST

Indian Stock Market Update 7 May: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारतीय लष्करानं केलेल्या अचूक हल्ल्यानंतर भारतीय शेअर बाजार फोकसमध्ये आहे. आता यासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय.

Indian Stock Market Update 7 May: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारतीय लष्करानं केलेल्या अचूक हल्ल्यानंतर भारतीय शेअर बाजार फोकसमध्ये आहे. पाकिस्तानवरील या कारवाईनंतर आता भारतीय शेअर बाजाराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. एनएसई आणि बीएसईनं परदेशी युजर्ससाठी त्यांच्या वेबसाइटवर एन्ट्री करण्यास तात्पुरते निर्बंध घातले आहे. 

बुधवारी कामकाजाच्या सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली. शेअर बाजारनंही ऑपरेशन सिंदूरला सलामी दिल्याचं दिसून आलं. सकाळी ९.३० वाजता सेन्सेक्स ८०,७६१.९२ अंकांवर पोहोचला. नंतर तो १२०.८५ अंकांनी म्हणजेच ०.१५ टक्क्यांनी वधारला. तर निफ्टी ५२.८० अंकांनी वधारून २४,४३२.४० वर व्यवहार करत होता. दुपारी १२.५२ वाजता सेन्सेक्स ८०,६६२.९७ वर व्यवहार करत होता. तो २१.९० अंकांनी म्हणजे ०.०३ टक्क्यांनी वधारला.

शेअर बाजाराबाबत घेतला मोठा निर्णय

दरम्यान, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) आणि बीएसई लिमिटेड या भारतातील दोन प्रमुख एक्स्चेंजनं परदेशी युजर्ससाठी त्यांच्या वेबसाइट्सची एन्ट्री तात्पुरती बंद केली आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या भारतीय बाजारात व्यापार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. सायबर हल्ले टाळण्यासाठी मंगळवारी एक्स्चेंजच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बीएसईच्या प्रवक्त्याशी रॉयटर्सनं संपर्क साधला असता, त्यांनी सायबर धोक्यांचा ही उल्लेख केला, परंतु एक्सचेंजला अलीकडे सायबर धोक्यांचा सामना करावा लागला आहे की नाही याबाबत सांगितलं नाही.

टॅग्स :शेअर बाजारऑपरेशन सिंदूर