Join us

अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:53 IST

Gautam Adani Big Move : उद्योगपती गौतम अदानी यांनी आपल्या उर्जा व्यवसायचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल टाकलं आहे. अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत निघालेली कंपनी खरेदी करणार आहेत.

Gautam Adani Big Move: देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि मोठे उद्योगपती गौतम अदानी यांनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती जगभरात वाढवण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. याच क्रमाने त्यांनी आता अनिल अंबानी यांच्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीला खरेदी करून ऊर्जा क्षेत्रात आणखी एक मोठा डाव टाकला आहे. अदानी पॉवर लिमिटेडने, रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (VIPL) च्या ६०० मेगावॅट क्षमतेच्या बुटीबोरी औष्णिक वीज प्रकल्पाचे अधिग्रहण करण्याची योजना आखली आहे. हा प्रकल्प नागपूर येथे आहे.

४,००० कोटींच्या खरेदीला मिळाली मंजुरी!१८ जून रोजी, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) अदानी पॉवरला ४,००० कोटी रुपयांना VIPL खरेदी करण्यास अधिकृतपणे मान्यता दिली आहे. या महत्त्वपूर्ण अधिग्रहणामुळे, अदानी पॉवरला आपली वीज निर्मिती क्षमता वाढवण्यात मोठी मदत मिळेल, ज्यामुळे देशातील वाढती विजेची मागणी पूर्ण करणे सोपे होईल.

या अधिग्रहणासाठी अदानी पॉवरने एक विशेष उपाय योजना सादर केली होती. एनसीएलटीच्या मंजुरीनंतर, अदानी पॉवर आता VIPL मध्ये १०० टक्के हिस्सा खरेदी करेल. या यशस्वी रिझोल्यूशन प्लॅनमध्ये, कंपनीच्या अधिग्रहणासाठी ४,००० कोटी रुपयांच्या देयकासह, अदानी पॉवरने VIPL च्या ६,७५३ कोटी रुपयांचे दायित्व देण्याचेही मान्य केले आहे.

अदानी पॉवरची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील फायदे*२४ फेब्रुवारी रोजी, अदानी पॉवरने त्यांच्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये VIPL च्या अधिग्रहणासाठीच्या रिझोल्यूशन प्लॅनला कमिटी ऑफ क्रेडिटर्स (COC) कडून मंजुरी मिळाल्याची माहिती दिली होती. १९ जूनपर्यंत, अदानी पॉवरचे मार्केट कॅपिटलायझेशन २.०७ लाख कोटी रुपये होते.

गुरुवारी अदानी पॉवरच्या शेअरची किंमत ५३३.२० होती. आर्थिक वर्ष २०२५ च्या मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४ टक्क्यांनी घसरून २,६३७ कोटी झाला होता, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २,७३७ कोटी होता.

कोणाला फायदा होईल?या करारामुळे अदानी पॉवरची उत्पादन क्षमता वाढेल आणि विदर्भात त्यांची उपस्थिती मजबूत होईल. कोळसा, सौर आणि पवन ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये आधीच मजबूत असलेल्या अदानी समूहाची औष्णिक वीज क्षमता यामुळे आणखी वाढेल. तर रिलायन्स पॉवरवर मोठ्या कर्जाचा दबाव असल्याने, हा करार अनिल अंबानींना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्याची एक मोठी संधी देऊ शकतो.

वाचा - युद्ध आणि महागाईच्या चिंतेतही बाजाराचा 'चमत्कार'! निफ्टी २५,००० पार, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

हा करार भारतीय ऊर्जा क्षेत्रात मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा करार दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरू शकतो, परंतु त्याचे खरे परिणाम येणाऱ्या काळातच स्पष्ट होतील. 

टॅग्स :गौतम अदानीअदानीअनिल अंबानीशेअर बाजार