Join us

अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी मंगळवार ठरला 'शुभ', एका दिवसात कमावले १.२ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 15:48 IST

अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी मंगळवारचा दिवस शुभ ठरला.

अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी मंगळवारचा दिवस शुभ ठरला. मंगळवारी अदानी समूहाचे शेअर्स २० टक्क्यांनी वाढले. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सकारात्मक टिप्पणी केली होती. त्याचा परिणाम आज दिसून आला आणि अदानी समूहाचे शेअर्समध्ये तेजी दिसून आली. २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर समूहाच्या शेअर्मध्ये घसरण झाली होती. परंतु आता गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समधील तेजीनंतर गुंतवणूकदारांना १.२ लाख कोटी रुपयांचा फायदा झालाय. अदानी समूहाच्या १० लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ११.४६ कोटी रुपयांवर पोहोचलें आहे. हिंडेनबर्ग रिपोर्ट समोर येण्यापूर्वी समूहाचं मार्केट कॅप १९.२ लाख कोटी रुपये होतं.अदानी टोटल गॅसमध्ये सर्वाधिक २० टक्क्यांची वाढ दिसून आली. अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी ग्रीन, अदानी पॉवर, एनडीटीव्ही आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये १० ते १७ टक्क्यांनी वाढ झाली. अदानी पॉवरच्या शेअर्सनं हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर झालेला तोटा तर भरून काढलाच पण १७ टक्क्यांच्या वाढीसह ४६४.३० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. या वर्षी या शेअरनं आतापर्यंत गुंतवणूकदारांना ५० टक्के परतावा दिला आहे.(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अदानीशेअर बाजार