Zepto Property : आतापर्यंत तुम्ही झेप्टो या क्विक कॉमर्स ॲपवरून किराणा, भाज्या किंवा इतर घरगुती वस्तू ऑर्डर करत असाल, पण आता लवकरच तुम्ही या प्लॅटफॉर्मवर प्लॉटसुद्धा खरेदी करू शकाल. झेप्टोने देशातील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL) सोबत एक मोठा करार केला आहे. त्यामुळे आता किराणा सामानाप्रमाणे प्रॉपर्टी देखील खरेदी करता येईल का? अशी चर्चा होऊ लागली आहे.
झेप्टोच्या जाहिरातीने ग्राहक हैराणजन्माष्टमीच्या निमित्ताने झेप्टो आणि HoABL ने एक नवी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये एक झेप्टो डिलिव्हरी बॉय सुंदर प्लॉट दाखवताना दिसत आहे. या जाहिरातीची टॅगलाईन आहे, "या जन्माष्टमीला, देशातील सर्वात मोठ्या ब्रँडेड लँड डेव्हलपर, हाऊस ऑफ अभिनंदन लोढा आणि झेप्टोसोबत जमीन गुंतवणुकीचं स्वप्न पूर्ण करा." या जाहिरातीवरून हे स्पष्ट होते की, झेप्टो आता फक्त १० मिनिटांत घरगुती वस्तूच नाही, तर जमिनीसारखी मोठी गुंतवणूकही देऊ करत आहे.
झेप्टो मॅजिकब्रिक्स किंवा ९९ एकर बनेल?सध्या झेप्टो फक्त HoABL च्या प्लॉटची विक्री करणार की भविष्यात मॅजिकब्रिक्स किंवा ९९ एकरसारख्या इतर रिअल इस्टेट कंपन्यांसोबतही काम करेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या करारामुळे क्विक कॉमर्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात एक नवी क्रांती येण्याची शक्यता आहे.
याआधीही केले आहेत असे अनोखे प्रयोगझेप्टोसाठी अशा प्रकारचा प्रयोग काही नवीन नाही. यापूर्वी, फेब्रुवारी महिन्यात त्यांनी स्कोडासोबत करार करून ग्राहकांना स्कोडा कुशाकची टेस्ट ड्राईव्ह बुक करण्याची संधी दिली होती. त्यावेळी १० मिनिटांत कार डिलिव्हरीची चर्चा सुरू झाली होती, पण झेप्टोचे सह-संस्थापक आदित पलिचा यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले होते की हा फक्त एक प्रायोगिक करार आहे.
वाचा - गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
कंपनी IPO आणण्याच्या तयारीतझेप्टो सध्या शेअर बाजारात आपला IPO आणण्याची तयारी करत आहे. या योजनेचा भाग म्हणून, कंपनीने भारतात आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झेप्टोला नुकतीच मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसकडून ४०० कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक मिळाली आहे, ज्यामुळे कंपनीचे मूल्यांकन सुमारे ४७,२९८ कोटी रुपये (५.४ अब्ज डॉलर्स) झाले आहे. आयपीओसाठी कंपनीचे संस्थापकही १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.