Silver Price : गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा होताना दिसत आहे. पण, यामध्ये आता चांदीही मागे राहिली नाही. २०२५ मध्ये चांदीने जोरदार परतावा देऊन सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. या वर्षी सोन्याने प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर २०११ नंतर पहिल्यांदाच चांदीची किंमत प्रति किलो १,२५,००० रुपयांच्या पुढे गेली आहे.
३ सप्टेंबर २०२५ रोजी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,०६,००० रुपयांच्या वर गेला आहे. मात्र, परताव्याच्या बाबतीत चांदीने बाजी मारली आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत चांदीने ४०% पेक्षा जास्त परतावा दिला आहे, तर गेल्या एका महिन्यात त्यात १०% वाढ झाली आहे. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, त्याचा थेट फायदा काही भारतीय कंपन्यांना आणि क्षेत्रांना झाला आहे.
हिंदुस्तान झिंक आणि वेदांताला मोठा फायदाचांदीच्या दरातील वाढीचा थेट परिणाम हिंदुस्तान झिंक आणि वेदांता यांसारख्या खाण कंपन्यांच्या शेअर्सवर झाला आहे. हिंदुस्तान झिंकचा शेअर १ आणि २ सप्टेंबर रोजी अनुक्रमे ३.९% आणि १% ने वाढला. वेदांताच्या शेअर्समध्येही चांगली सुधारणा दिसून आली.
हिंदुस्तान झिंक ही जगातील तिसरी सर्वात मोठी चांदी उत्पादक कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये त्यांनी सुमारे ६८७ मेट्रिक टन चांदीचे उत्पादन केले असून, २०३० पर्यंत ते वाढवून १५०० मेट्रिक टन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या मते, चांदीची मागणी आणि किंमत दोन्ही भविष्यात मजबूत राहतील. केवळ खाण कंपन्याच नव्हे, तर गोल्डियाम इंटरनॅशनल सारख्या दागिने निर्यातदार कंपन्यांनाही वाढत्या चांदीच्या किंमतींचा फायदा झाला आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि निर्यातीच्या वाढत्या मागणीमुळे या कंपन्या चांगला नफा कमावत आहेत.
सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा ट्रेंड२०२५ मध्ये सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. निप्पॉन इंडियाच्या सिल्व्हर ईटीएफची 'व्यवस्थापित मालमत्ता' आता १०,००० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. हे आकडे दर्शवतात की भारतीय गुंतवणूकदार आता केवळ गोल्ड ईटीएफपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर चांदीमध्येही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये सलग सातव्या महिन्यात सिल्व्हर ईटीएफच्या एयूएममध्ये वाढ नोंदवली गेली, जो २०२० नंतरचा सर्वात मोठा वाढीचा काळ आहे.
वाचा - ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड
फेडरल रिझर्व्हच्या धोरणांनी मिळाला सपोर्टचांदीच्या दरातील वाढीचे आणखी एक मोठे कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात करण्याची शक्यता. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा बुलियन बाजारातील (सोने-चांदी) मागणी वाढते, कारण त्यांचा परतावा अधिक आकर्षक वाटू लागतो. याच कारणामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी आता चांदीला एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे.