Silver Rate : गेल्या वर्षभरात सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. आता चांदीची बारी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, अलिकडच्या काळात चांदीच्या किमतीत जबरदस्त वाढ झाली असून ती सध्या १ लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या चांदीमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा: चांदीची किंमत दुप्पट होणार!'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सोशल मीडिया X वर एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या प्रति औंस ३५ डॉलर्स असलेल्या चांदीची किंमत या वर्षाच्या अखेरीस दुप्पट होऊन ७० डॉलरपर्यंत पोहोचू शकते. ते गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कियोसाकी सोन्या आणि बिटकॉइनपेक्षा चांदीला सध्या एक चांगला गुंतवणूक पर्याय मानतात, कारण ते अजूनही त्याच्या ऐतिहासिक उच्चांकापेक्षा खूप खाली आहे.
चांदीची मागणी का वाढत आहे?चांदीच्या वाढत्या मागणीमागे अनेक कारणे आहेत. सौरऊर्जेसारख्या क्षेत्रांमध्ये आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात हे खरे असले तरी, गेल्या दोन वर्षांत चांदीच्या किमतीत ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, फक्त सहा महिन्यांत चांदी ८७,००० रुपयांवरून १.०४ लाख प्रति किलोवर पोहोचली आहे.
चांदी १.२५ लाखांपर्यंत जाऊ शकते!बाजार तज्ज्ञांना विश्वास आहे की, चांदीची किंमत लवकरच सव्वा लाखांच्या (१.२५ लाख) जवळ जाऊ शकते. रॉबर्ट कियोसाकी यांचा चांदीची किंमत दुप्पट होण्याचा दावा थोडा जास्त वाटत असला तरी, या वर्षात चांदीचा भाव मजबूत वाढीच्या ट्रेंडमध्ये राहील हे निश्चित आहे. त्यामुळे, दीर्घकाळात चांदी एक चांगला गुंतवणूक पर्याय ठरू शकते.
वाचा - मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)