Join us

₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:02 IST

मुंबईतील अब्जाधीश नवीन पिढी जुने बंगले सोडून वरळी सी फेसच्या आधुनिक ‘स्काय-विला’कडे आकर्षित होत आहे.

मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला वरळी सी फेस एकेकाळी फक्त एक फिरायला जाण्याचे ठिकाण होते. काही उंच इमारती, एखाद दुसरा बंगला आणि आता बंद झालेली वरळी डेअरी...एवढीच या भागाची ओळख! पण २००९ मध्ये वांद्रे-वरळी सी लिंक सुरू झाल्यानंतर या परिसराचे नशीबच पालटले. काही मिनिटांत उपनगराला दक्षिण मुंबईशी जोडणाऱ्या या पूलामुळे वरळीची कनेक्टिव्हिटी सुधारली आणि आज हा भाग मुंबईतील सर्वात श्रीमंत परिसर बनला आहे.

अब्जाधीशांची पहिली पसंत...

पूर्वी मुंबईतील मलबार हिल आणि पेडर रोड हे पारंपरिकरित्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यांचे ठिकाण मानले जायचे. जुन्या, प्रशस्त बंगल्यांसह शांत परिसर ही त्याची ओळख होती. पण आता शहरातील अब्जाधीश नवीन पिढी जुने बंगले सोडून वरळी सी फेसच्या आधुनिक ‘स्काय-विला’ (Sky-Villas) कडे आकर्षित होत आहे. या भागात गेल्या काही वर्षांत देशातील सर्वात महागडे मालमत्ता व्यवहार झाले आहेत.

ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांनी २०१२ मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरकडून ₹४५० कोटींचा बंगला खरेदी केला. याशिवाय, गोदरेज समूहाच्या तन्या दुबाश यांनी वरळीतील ‘नमन ज़ाना’ टॉवरमधील ९,२१४ चौरस फूट डुप्लेक्स ₹२२५.७६ कोटींना विकत घेतला. याची फक्त बाल्कनीच १,२७७ चौरस फूट आहे. फार्मा दिग्गज USV लिमिटेडच्या अध्यक्षा लीना गांधी तिवारी यांनीदेखील याच टॉवरमध्ये दोन डुप्लेक्स ₹६३९ कोटींना खरेदी केले. हा भारताच्या इतिहासातील सर्वात महागड्या करारापैकी एक मानला जातो.

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी तर वरळी सी फेसवरील ‘शिव सागर’ इमारत ₹४०० कोटींहून अधिक किंमतीत खरेदी केली. या व्यवहाराचा दर ₹२.७२ लाख प्रति चौरस फूट इतका होता. 

जुन्या बंगल्यांपासून ‘स्काय-विला’कडे झुकाव का वाढला?

  • वरळीतील उंच, आलिशान अपार्टमेंट्सची निवड करणामागे अनेक कारणे आहेत.
  • कनेक्टिव्हिटी- वरळी सी फेस वांद्रे-वरळी सी लिंकद्वारे थेट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ला जोडलेले आहे. यामुळे उद्योगपतींचा प्रवास वेळ वाचतो.
  • मुंबई कोस्टल रोडचा टप्पा वरळी सी फेसला मरीन ड्राईव्ह आणि दक्षिण मुंबईशी थेट जोडणार आहे.
  • वरळी-सेवरी एलिव्हेटेड कनेक्टर पूर्ण झाल्यानंतर वरळी थेट ‘अटल सेतू’ (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) शी जोडले जाईल, त्यामुळे नवी मुंबई आणि नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठणे अधिक सोपे होईल.
  • याशिवाय, वरळी सी फेसवरील गगनचुंबी टॉवर्समधून अरबी समुद्र आणि वांद्रे-वरळी सी लिंकचे सुंदर दृष्य दिसते. त्यामुळेच हे हा भाग आता मुंबईतील “नवीन मलबार हिल” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
टॅग्स :मुंबईवरळीगुंतवणूकबांधकाम उद्योग