Join us

Retirement Planning : सेवानिवृत्तीचं असं करा नियोजन, म्हातारपण जाईल सुखात; कोणाकडे पसरावे लागणार नाही हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 11:38 IST

Retirement Planning : म्हातारपण सुखात जगण्यासाठी, तुम्हाला तुमच्या तारुण्यापासूनच सेवानिवृत्तीचे नियोजन करावे लागेल. निवृत्तीनंतर तुमच्याकडे किती पैसे असावेत याचं गणित मांडावं लागेल.

Retirement Planning : मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी, असं आपल्याकडे आवर्जून सांगितलं जातं. मात्र, सध्याच्या महागाईच्या काळात या व्याख्येत बदल करणे आवश्यक आहे. आपल्या मुलांवर ओझं व्हायचं नसेल तर आत्तापासूनच निवृत्तीचं नियोजन करणे आवश्यक आहे. म्हातारपणी जर तुमच्या गाठीशी चांगला पैसा असेल तर कोणावर अवलंबून राहण्याची किंवा आर्थिक मदतीसाठी हात पसरण्याची गरज उरणार नाही. निवृत्तीनंतर तुमच्याकडे किती पैसे असले पाहिजेत याचा हिशोब तुम्हाला करावा लागेल. जेणेकरून तुम्ही तुमचे म्हातारपण आरामात घालवू शकाल.

म्हातारपणी किती पैसे असावेत?आज तुम्ही ज्या प्रकारचे जीवन जगत आहात तसेच आयुष्य वृद्धापकाळातही हवे असेल तर तुम्हाला 30X चा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजेच तुमचा सेवानिवृत्ती निधी तुमच्या सध्याच्या वार्षिक खर्चाच्या किमान ३० पट असावा. उदाहरणार्थ, जर तुमचा आजचा वार्षिक खर्च ९ लाख रुपये आहे, म्हणजे प्रत्ये महिन्याचा खर्च ७५ हजार रुपये असेल, तर 30X नियमानुसार, तुम्ही ९,००,०००×३० = २,७०,००,००० रुपये निवृत्ती निधी जमा केला पाहिजे.

निधी कसा उभा करायचावृद्धापकाळासाठी एवढी मोठी रक्कम जमा करण्यासाठी, तुम्हाला दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. यात कमी जोखमीत चांगला परतावा मिळेल. आजच्या काळात, परताव्याच्या बाबतीत म्युच्युअल फंड ही खूप चांगली योजना मानली जाते. यामध्ये तुम्ही एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. SIP मध्ये तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. दीर्घकालीन त्याचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो.

किती गुंतवणूक करावी?तुमचे वय ३० वर्षे असल्यास आणि २,७०,००,००० रुपये जमा करायचे असल्यास, तुम्हाला किमान ७७०० रुपयांची SIP नियमित ३० वर्षे चालवावी लागेल. अशा परिस्थितीत, वयाच्या ६०व्या वर्षी तुम्ही २७,७२,००० रुपये गुंतवाल. १२ टक्के दराने तुम्हाला यावर २,४४,०८,३३६ रुपये व्याज मिळेल आणि तुम्ही ६० वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला एकूण २,७१,८०,३३६ रुपये मिळतील.

जर तुमचे वय ३५ वर्षे असेल, तर तुम्हाला किमान २५ वर्षे दरमहा १४,५०० रुपयांची SIP चालवावी लागेल. २५ वर्षांमध्ये तुम्ही एकूण ४३,५०,००० रुपये गुंतवले जातील, यावर तुम्हाला १२ टक्के दराने २,३१,६५,७०९ रुपये व्याज मिळेल आणि वयाच्या ६० व्या वर्षी तुम्हाला एकूण २,७५,१५,७०९ रुपये मिळतील.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारपैसा