Join us

भारताच्या GDP ला मिळाली गती, अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत दर्शवली 6.2 टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:29 IST

India GDP: भारताच्या अर्थव्यवस्थेने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत (Q3FY25) 6.2 टक्के वाढ नोंदवली आहे.

India GDP: भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आनंदाची बातमी आली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत (Q3FY25) 6.2 टक्के वाढ नोंदवली आहे. हे मागील तिमाहीच्या (जुलै-सप्टेंबर) 5.6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अर्थशास्त्रज्ञ आणि डी-स्ट्रीट तज्ञांनी देखील 6.2-6.3 टक्क्यांच्या दरम्यान जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला होता, जो सरकारी खर्च आणि शहरी उपभोगातील सुधारणांमुळे शक्य झाला आहे.

आकडे काय सांगतात?

Q3FY25 GDP वाढ: 6.2 टक्के (मागील तिमाहीत 5.6 टक्के)

मागील वर्षी याच तिमाहीत (Q3FY24): 9.5 टक्के वाढ

2024-25 साठी जीडीपी वाढीचा अंदाज: 6.5 टक्के

2023-24 साठी सुधारित जीडीपी वाढ: 9.2 टक्के (आधी 8.2 टक्के अंदाजित)

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) 28 फेब्रुवारी रोजी ही आकडेवारी जाहीर केली. जानेवारी 2025 मध्ये जाहीर झालेल्या पहिल्या अंदाजात NSO ने 2024-25 साठी GDP वाढीचा अंदाज 6.4 टक्के ठेवला होता, पण आता तो 6.5 टक्के करण्यात आला आहे.

वाढीचे कारण काय?

सरकारी खर्चात वाढ : सरकारने पायाभूत सुविधा आणि इतर प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूक केली आहे.

शहरी उपभोगात सुधारणा: शहरी भागातील लोकांची खरेदी आणि खर्च करण्याची क्षमता वाढली आहे.

सेवा क्षेत्राचे योगदान: भारताच्या GDP चा प्रमुख भाग असलेल्या सेवा क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे.

भविष्य काय असेल

भारताची अर्थव्यवस्था हळूहळू मजबूत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विकासदर कमी असला, तरी जागतिक मंदी आणि महागाई वाढूनही हे सकारात्मक लक्षण आहे. NSO ने 2024-25 साठी GDP वाढीचा अंदाज 6.5 टक्के ठेवला आहे. सरकारी धोरणे योग्य दिशेने काम करत राहिल्यास आणि जागतिक परिस्थिती स्थिर राहिल्यास भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढू शकते. 

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतगुंतवणूकभाजपा